फेरबदल हे आयुक्तांचे अधिकार; वैद्यकीय अधिकाऱ्याची याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:28 AM2019-07-22T00:28:55+5:302019-07-22T00:29:00+5:30
तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांचा मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ काढून तो डॉ. जयवंत धुळे यांच्याकडे सोपवला
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार पालिका आयुक्तांनी काढून घेतल्यामुळे नाराज होऊन अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पालिका कामकाजात फेरबदल करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असून त्या अधिकारात त्यांनी शेट्टी यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्याने त्यांच्या कोणत्याही कायदेशीर हक्काला बाधा येत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे.
पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असताना डॉ. शेट्टी यांनी कामामध्ये अनियमितता आढळल्याने शासनाच्या आदेशावरून आयुक्तांनी पालिकेचे मुख्य लेखाधिकारी कालिदास जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.
चौकशीअंती डॉ. शेट्टी यांच्या कामावर ताशेरे ओढणारा अहवाल आयुक्तांना सादर केला गेला. शेट्टी या दोषी आढळून आल्यामुळे तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांचा मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ काढून तो डॉ. जयवंत धुळे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेऊन आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या याचिकेची सुनावणी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली.
पालिका आयुक्तांना प्रशासनाचे कामकाज चालवण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त असून जबाबदारीमध्ये फेरबदलाचे अधिकारही प्राप्त आहेत. त्यामुळे डॉ. शेट्टी यांच्याकडील कार्यभार काढून घेतल्याने त्यांच्या कोणत्याही कायदेशीर हक्काला बाधा येत नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने याचिका फेटाळली.