वाहतूक, आरोग्याच्या समस्या सोडवणार, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 02:08 AM2019-05-24T02:08:47+5:302019-05-24T02:10:07+5:30
मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे. जलवाहतुकीसाठी पाच वर्षांत जे प्रयत्न झाले, ते आता अस्तित्वात येतील. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
विजयाचे श्रेय कोणाला देणार?
नागरिक, मतदारांचा पाठिंबा तसेच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी दाखवलेला विश्वास, सर्वांनी एकदिलाने केलेली मेहनत यामुळेच हे यश मिळाले आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी काय करणार?
ठाणेपलीकडील प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी लोकलच्या फेºया वाढवण्यावर भर असणार आहे. आणखी महिला विशेष लोकल, १५ डब्यांच्या वाढीव लोकल व वातानुकूलित लोकल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
जलवाहतूक, मेट्रोबाबत काय सांगाल?
रेल्वेला पर्याय म्हणून रस्त्यांचे जाळे, जलवाहतूक, मेट्रो रेल्वे असे प्रकल्प मार्गी लावणार आहे. त्यासाठी विविध प्राधिकरणांशी समन्वय ठेवून कामे करून घेणार आहे.