शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:41 AM2019-01-25T03:41:50+5:302019-01-25T03:41:57+5:30

जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल.

Shilpata-Badlapur new metro roadmap | शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

Next

भिवंडी : जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल. तसेच शीळफाटा ते बदलापूर मेट्रो मार्गासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीत केली.
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग तसेच डोंबिवली ते वसई जलवाहतुकीचे पंधरा दिवसांत भूमिपूजन करून येत्या महिन्यात काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. त्याचप्रमाणे इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर पोहोचण्यास जलमार्ग विकसीत करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
भिवंडी तालुक्यातील वडपे ते ठाणे हा १ हजार १८३ कोटी रुपयांचा महामार्ग तसेच ४४५ कोटींच्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या नवीन महामार्गाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. खा. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी व शीळफाटा ते बदलापूर मेट्रोमार्गाची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
मेट्रो व रस्ते मार्गाने भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टीक पार्कमुळे हजारो नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. माणकोली व रांजनोली पुलाचे लांबलेले काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्गाडी पुलाच्या कामासाठी नव्याने निविदा काढल्या असून, ते कामही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी जाहीर केले.
मुंबई, ठाण्यासह कोकणात जलवाहतूक वेगाने होऊ शकेल. त्यादृष्टीने एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीच्या आराखड्याला पुढील आठवड्यात मंजुरी मिळेल. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई-बडोदा महामार्गाच्या निविदा काढल्या असून, पंधरा दिवसांत भूमिपूजनही करता येईल. जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत आठ जेट्टींना मंजुरी दिली आहे. ठाणे-वसई जलमार्गाचेही १५ दिवसांत भूमिपूजन होऊन, महिनाभरात काम सुरू होईल.
जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. भिवंडी व कल्याण मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मास रॅपीड ट्रान्सपोर्टचा फायदा होईल. माळशेज घाट रस्त्याचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे काम तातडीने सुरू होईल.मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे कामही सुरू असून, भूसंपादन झाले आहे. यासाठी अविकसीत भागातील जमीन संपादीत केल्याने, या भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.
>... तर मुंबईचा समुद्रही मॉरिशसप्रमाणे शुद्ध
गंगानदीचे शुद्धीकरण होऊ शकते, तर मुंबईचा अरबी समुद्रही मॉरिशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करता येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज गडकरी यांनी अधोरेखित केली.

Web Title: Shilpata-Badlapur new metro roadmap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.