शिंदे-आव्हाड मैत्रीला फुटला पाझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:10 PM2019-08-08T23:10:16+5:302019-08-09T06:21:26+5:30
गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिवसेनाही फोडण्याचे डावपेच सुरू
- अजित मांडके
ठाणे : येत्या २६ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप प्रभावशाली ठरण्याची चिन्हे दिसू लागताच हे ‘नाईकअस्त्र’ परास्त करण्याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मैत्रीला पाझर फुटला आहे. नाईकांच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रोखण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले असून स्थायी समिती गठीत करण्यावरून परस्परांना खिंडीत गाठणाऱ्या या दोन्ही पक्षांनी ही समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतून संदीप नाईक आणि सागर नाईक यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून खुंटीला टांगत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, आता गणेश नाईक हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. २६ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत मोठ्या सोहळ्यात नाईक यांचा भाजप प्रवेश होईल.
या सोहळ्याला नाईक हे एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार नसून नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर शिवसेनेच्या आठ नगरसेवकांनाही सोबत घेऊन ते प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ते स्वत: फोन करून घड्याळ काढण्यासाठी आग्रह धरीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर आदी शहरांसह ग्रामीण भागातून अनेक नगरसेवक, पदाधिकारी नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
ठाण्यात तर नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडणार असल्याचे संकेत प्राप्त होत असून ठाण्यातील त्यांच्या मर्जीतील काही शिवसेनेच्या नगरसेवकांना नाईक फोन करून संपर्क साधत असल्याची माहिती आहे. नाईकांनी व पर्यायाने भाजपने अशा पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला थेट आव्हान दिल्याने ठाण्यातील या दोन्ही पक्षांच्या गोटातही खळबळ माजली आहे. भाजपच्या भात्यातील हे नाईकअस्त्र रोखण्यासाठी आता एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांच्या जुन्या मैत्रीला पुन्हा पाझर फुटला आहे. नाईकांच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना थोपवण्याचे काम सध्या शिवसेनेकडून सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्याच सूत्रांनी दिली. नाईकांच्या निकटवर्तीय नगरसेवकांना फोन करून, आता पक्ष सोडू नका, योग्य वेळी तुमची काळजी घेऊ, असे सांगून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शिवसेनेने ठाणे महापालिकेतील स्थायी समिती गठीत करण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती आहे. नियमानुसार स्थायी समितीचे गठन न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक घेताना कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले, तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधिज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. त्याचाच आधार घेत आता स्थायी समिती सभापतीपदाचा मार्ग मोकळा करून घेतला आहे.
परंतु, यासंदर्भात आक्षेप घेणारी याचिका राष्टÑवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, अचानक राष्ट्रवादीच्या मंडळींनी ही याचिका मागे घेऊन शिवसेनेला टाळी देत, स्थायी समितीचा मार्ग मोकळा केला आहे. नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेनंतर झालेल्या या घडामोडींकडे राजकीय जाणकार शिंदे-आव्हाड यांच्या जुन्या मैत्रीला फुटलेला पाझर म्हणून पाहत आहेत.
धोका ओळखून आधीच हातमिळवणी?
गणेश नाईक भाजपमध्ये आल्यानंतर ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद आपसूक वाढणार आहे. नाईक हे यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले असल्याने त्यांची जिल्ह्याशी नाळ जोडली गेली आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा ठाण्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याचीही शक्यता आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यावर नाईक हे शिंदे व आव्हाड यांची आणखी कोंडी करण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून तत्पूर्वीच त्या दोघांनी हातमिळवणी केली आहे.