पुत्रप्रेमात शिंदे झाले धृतराष्ट्र
By admin | Published: May 28, 2017 03:15 AM2017-05-28T03:15:03+5:302017-05-28T03:15:03+5:30
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विनंतीवरून विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक अशा स्कायवॉकला मंजुरी दिली होती. त्या कामाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विनंतीवरून विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक अशा स्कायवॉकला मंजुरी दिली होती. त्या कामाचे भूमिपूजनही २०१४ मध्ये झाले होते, असा दावा करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या पुलाच्या कामाचे श्रेय आपल्या मुलाला मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा भूमिपूजनाचा घाट घातला असल्याकडे लक्ष वेधले. पुत्रप्रेमापोटी पालकमंत्री धृतराष्ट्र झाल्याची टीकाही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ यामधील लोकांच्या लग्नात नाचणाऱ्या अनोळखी अब्दुल्लासारखी पालकमंत्र्यांची अवस्था आहे, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात एक तरी ठळक काम केले असेल तर ते दाखवावे, असे आव्हान आव्हाडांनी शिंदे यांना दिले. केवळ श्रेय घेण्याचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
२५ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत आणि आपल्या हस्ते या स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षे विविध प्रकारच्या मंजुऱ्या घेण्यासाठी आपणच पाठपुरावा केला आहे. आता १ महिन्यापूर्वी या कामाचे कार्यादेश काढण्यात आल्यानंतर आपण केलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेत आहेत, असे आव्हाड म्हणाले.
भिवंडी, मालेगाव पालिकांमध्ये भाजपा-सेनेची पिछेहाट होताच आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जाते.
- रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते विटावा स्कायवॉकसह तब्बल ४० कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. स्कायवॉक आपण मार्गी लावलेला असतानाही पालकमंत्री श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आव्हाड म्हणाले.
स्कायवॉक उभारण्यामागे विटावा भागातील नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका करणे, हा उद्देश होता. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एमएमआरडीएच्या स्तरावर आपण पाठपुरावा केला होता, असे आव्हाड म्हणाले.