शिंदे-चव्हाणांचे गुफ्तगू
By admin | Published: January 3, 2017 05:43 AM2017-01-03T05:43:17+5:302017-01-03T05:43:17+5:30
शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात ठाणे महापालिका निवडणुकीत युती
ठाणे : शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात ठाणे महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पूर्वानुमतीखेरीज स्थानिक नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा नवे वादळ व वादंग निर्माण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात असून शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावण्याची संधी सोडत नाहीत. भाजपामधील काही नेतेही शिवसेना नेतृत्वावर महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांना भाजपासोबत युती हवी असून त्यामुळेच ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यात युतीची सत्ता येऊनही ज्यांना मंत्रिपदे, महामंडळांचे अध्यक्षपद किंवा तत्सम सत्तेतील वाटा मिळालेला नाही असे आमदार, नेते युतीमध्ये बिब्बा घालण्याचे काम करीत आहेत. मात्र मंत्रीपद लाभलेले नेते युती व्हावी या भूमिकेचे आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढवल्या तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपाचा मुकाबला करण्याकरिता सर्व रसद पुरवण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने शिंदे यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत समझोता झाला तर कल्याण-डोंबिवलीत लावावी लागली तशी आर्थिक ताकद लावावी लागणार नाही आणि मंत्रीपद पणाला लावण्याची वेळ येणार नाही, असे शिंदे समर्थकांना वाटते. भाजपाचे संख्याबळ ८ असून स्वतंत्र लढल्यास त्यामध्ये काही पटीत वाढ होईल, याची भाजपाला खात्री आहे. मात्र केडीएमसीसारखा संघर्ष करून सत्तेत दुय्यम भागीदार होण्यापेक्षा संघर्ष टाळून ताकद वाढवता आली तर बरे, असे चव्हाण यांना वाटत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
शिंदे-चव्हाण यांच्यातील युतीची चर्चा सकारात्मक झाली असून या बैठकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही पूर्वकल्पना दिली गेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मागील महापालिका निवडणुकीच्यावेळी मनसेने शिवसेनेबरोबर युती करावी, अशी गळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घालण्याकरिता शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. खुद्द राज यांनी जाहीर सभेत हा गौप्यस्फोट केल्यावर उद्धव यांना अंधारात ठेवून ही भेट झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर उध्दव यांनी या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळे आता चव्हाण यांच्यासोबत शिंदे यांनी केलेल्या राजकीय गुफ्तगूची उद्धव कशी दखल घेतात, याकडे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)