‘ठाण्याच्या जागेचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार- शंभुराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:26 PM2023-09-27T12:26:57+5:302023-09-27T12:27:35+5:30
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवतील तर ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदारसंघांतून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि इतर नऊ पक्षांचा समावेश आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाने लढवावी, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ दाेषींवर हाेणार कारवाई
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला त्याचा चौकशी अहवाल लवकरच येणार आहे. यामध्ये जे काेणी दाेषी आढळतील त्यांच्यावर कठाेर कारवाई केली, जाणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.