शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 02:24 PM2023-07-26T14:24:56+5:302023-07-26T14:25:34+5:30
शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे .
धीरज परब
मीरारोड - ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात भाजपाचाच आमदार करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे, युतीबिती डोक्यातून काढून टाका असे फडणवीस सांगत आहेत. जे काय व्हायचे ते होईल असा दावा भाजपाचे ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे प्रभारी मनोहर डुंबरे यांनी केला आहे. भाजपच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचा मतदार संघ हिसकावून घेण्याची भाषा भाजपा नेत्याने फडणवीस यांचे नाव पुढे करत केल्याने राजकीय वर्तुळात त्याचे पाडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच किशोर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा हे माजी आमदार नरेंद्र मेहतांचे समर्थक मानले जातात . गेले काही वर्ष जिल्हाध्यक्ष पद आपल्या मर्जीतले नसल्याने नाराज असलेले मेहता शर्मा यांच्या नियुक्तीनंतर आनंदी झाले असून त्यांनी मीरारोड मध्ये शर्मा यांच्या सत्काराचा मेळावा ठेवला होता. या मेळाव्यात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मीरा भाईंदर भाजपाचे प्रभारी जयप्रकाश ठाकूर, ओवळा माजिवडा १४६ मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी मनोहर डूंबरे आदी उपस्थित होते . शर्मा यांच्या नियुक्ती निमित्त मेहतांनी आपले शक्ती प्रदर्शन केले .
यावेळी मनोहर डुंबरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात भाजपाचाच आमदार करायचा आहे . देवेंद्रजी यांचे स्वप्न आहे. ह्या मतदार संघात नगरसेवक भाजपाचे जास्त असल्याचा मुद्दा सुद्धा त्यांनी मांडला. ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात आमदार प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यात ठाणे व मीरा भाईंदरचा काही परिसर येतो. राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे सरकार येऊन मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला आहे . त्यानंतर आता भाजपाच्या डुंबरे यांनी थेट फडणवीस यांचा हवाला देऊन युतीचा विचार डोक्यातून काढून टाका सांगत शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे .
आमदार गीता जैन यांना सुद्धा भाजपा धक्का देणार का ?
मीरा भाईंदर मतदार संघात सुद्धा भाजपाचा आमदार हवा असे सांगत नरेंद्र मेहतांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा दुप्पट मतांनी त्यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे असे देखील डुंबरे यांनी भाषणात म्हटले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेले मेहता हे सतत वादग्रस्त ठरल्याने २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाच्याच बंडखोर गीता जैन यांना अपक्ष आमदार म्हणून निवडून देत मेहतांना पराभवाची धूळ चारली होती. आमदार झाल्यावर त्या भाजपा सोबत गेल्या मात्र मेहतामुळे त्यांनी शिवसेनेचे कास धरली. राज्यात शिंदे सरकार आल्यावर त्या पुन्हा भाजपा सोबत आल्या आहेत.परंतु डुंबरे यांनी मीरा भाईंदर मतदारसंघातून मेहतांची एकप्रकारे उमेदवारीच जाहीर केल्याने आ. जैन यांच्या बाबत भाजप नेतृत्व यांची भूमिका वेगळी असल्याची बाब समोर आली आहे.