'संजय राऊत महाविकास आघाडीच्या पगारावर काम करतात'; नरेस म्हस्के यांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:46 PM2023-11-29T13:46:10+5:302023-11-29T13:46:55+5:30
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भांडुप परिसरात वातावरण चांगलेच तापले आहे. दत्ता दळवींना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दळवी यांचा गुन्हा काय तर त्यांनी लोकांच्या जनभावना भांडुपच्या मेळाव्यात व्यक्त केल्या. जे गद्दारहृदयसम्राट आहे ते स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेतायेत. त्यावर तमाम हिंदू आणि जनतेचा आक्षेप आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण ते वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची उपाधी लावून घेतायेत. जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चाबकानं फोडून काढले असते. धर्मवीर आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. चित्रपटातील हा शब्द सेन्सॉरनं कापला नाही. जर तो आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
संजय राऊतांच्या टीकेवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या पगारावर काम करतात. जसे आपण नोकरीला जातो आणि कार्ड पंच करतो तसे ते सकाळी कार्ड पंच करतात. युती शासनाच्या विरोधात बोलण्याकरता त्यांना तिथे पगारावर ठेवलेले आहे. संजय राऊतांनी त्यांची योग्यता तपासणे गरजेचं आहे. ज्यांच्या मतांवर ते खासदार झालेत त्यांनाच ते शिव्या देत आहेत, असा निशाणा नरेश म्हस्के यांनी राऊतांवर साधला.
दरम्यान, नारायण राणे, अब्दुल सत्तार यांनी सभेत शिवीगाळ केली त्यांना अटक नाही, गुन्हा नाही. पण दत्ता दळवी यांनी लोकभावना व्यक्त केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दारहृदयसम्राट मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री जे प्रचाराला बाहेर फिरतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. दत्ता दळवी यांनी केलेल्या विधानाचा आम्ही जाहीर समर्थन करतो. सरकार नालायक असेल तर नालायकच बोलणार. देशात आणीबाणी लागलीय का? नालायक हा असंसदीय शब्द नाही असंही राऊतांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
भांडुपमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे दत्ता दळवी यांनी राजस्थानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख केलेल्या बॅनरचा समाचार घेतला. त्यावेळी दत्ता दळवी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. यावरून तक्रारीची दखल घेत आज सकाळी पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली.