शिंदे गटाच्या विकास रेपाळेंना होणार अटक?; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:01 AM2023-01-12T07:01:38+5:302023-01-12T07:01:51+5:30
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला.
ठाणे : भाजपचे वागळे इस्टेट मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ठाण्यातील भाजपचे जाधव यांच्यावर शिंदे गटाचे नगरसेवक रेपाळे आणि त्यांच्या नऊ ते दहा कार्यकर्त्यांनी कशिश पार्क येथे जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३० डिसेंबर २०२२ रोजी घडली. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सोसायटीमध्ये बॅनर लावण्यावरून रेपाळे आणि जाधव यांच्यात हा वाद उफाळून आला. याच वादातून रेपाळे यांच्यासह नऊ ते दहाजणांच्या गटाने जाधव यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या मारहाणीच्या घटनेनंतर ठाणे जिल्हा भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि रूपाली रेपाळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
हत्यारे जप्त करणे बाकी
बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, पोलिसांनी आरोपींचा ताबा घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच हल्ल्याच्या वेळी त्यांनी वापरलेली हत्यारे जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे तसेच फिर्यादीचे वकील ॲड. मकरंद अभ्यंकर आणि ॲड. सुरेश कोलते यांनी न्यायालयात केली. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रेपाळे यांच्यासह तिघांचाही अर्ज फेटाळला.