मुख्य आरोग्य अधिकारी पदावरून शिंदे यांची पुन्हा उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:20+5:302021-05-29T04:29:20+5:30
ठाणे : शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात ...
ठाणे : शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आता त्यांना तेथून हलवून त्यांच्यावर पार्किंग प्लाझा कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. वैजयंती देवगीकर यांची मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तत्कालीन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांच्या जागी डॉ. देवगीकर यांच्यावर या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या पदावर सक्षम अधिकारी असावा म्हणून डॉ. शिंदे यांना पुन्हा ठाणे महापालिकेत पाठवून त्यांच्यावर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला; परंतु त्यांच्या नावाला बहुसंख्य नगरसेवकांनी विरोध केला होता. यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती; परंतु त्यांच्याकडून योग्य कामकाज न झाल्याने त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरापूर्वी त्यांना पुन्हा त्याच पदावर आणण्यात आल्याने नाराजी वाढली होती. तसेच त्यांना देखील येथे काम करण्याची इच्छा नसल्याची माहिती उघड झाली होती; परंतु असे असतानाही त्यांना येथे ठेवून घेण्यात आले.
दरम्यान, आता त्यांच्या नावाला वाढता विरोध लक्षात घेऊन ठामपाने त्यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे. आता त्यांच्यावर पार्किंग प्लाझा कोविड सेंटरची जबाबदारी सोपविली आहे. तर त्यांच्या जागी डॉ. देवगीकर यांना मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर कायम ठेवले आहे.
---------------