शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:15 IST2025-01-12T08:15:12+5:302025-01-12T08:15:44+5:30

उद्धवसेनेच्या स्वबळाच्या दाव्यावर सरनाईकांचे तोंडसुख 

Shinde Sena wants a grand alliance; but BJP is a salt shaker | शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

ठाणे : महापालिका निवडणुका महायुतीत लढण्याचे संकेत शिंदेसेनेकडून देण्यात आले. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्याखेरीज भाजप महापालिका निवडणुका युतीत लढणार की स्वबळावर हे स्पष्ट करणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने शिंदेसेनेने उद्धवसेनेचे संख्याबळ एक अंकी होईल, असे भाकीत केले. परंतु, मविआतील घटकपक्ष असलेल्या शरद पवार गटाने याबाबत मौन बाळगणे पसंत केले.

ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच लढविल्या जातील, असे संकेत दिले. त्यानंतर आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी त्याला दुजोरा दिला. उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. मात्र, भाजप आपले पत्ते लागलीच जाहीर करायला तयार नाही. स्थानिक कार्यकर्तेच युती की स्वबळावर निवडणूक लढवायची हे ठरवतील, असे भाजपने स्पष्ट केले.

आगामी महापालिका निवडणुका महायुतीत लढवणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. उद्धवसेनेने जर स्वबळावर निवडणुका लढल्या तर त्यांची दोन आकड्यांची सदस्यसंख्या एक अंकी झाल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. त्यातूनच कधी महाविकास आघाडीचे तर कधी महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. 
    - प्रताप सरनाईक,
    परिवहनमंत्री, महाराष्ट्र

संजय राऊत यांनी स्वबळाची भाषा का केली ते कळत नाही. मात्र, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल. त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. 
- जितेंद्र आव्हाड, 
आमदार, राष्ट्रवादी 
शरद पवार गट

महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते घेतील. त्यानंतरच याबाबत भूमिका जाहीर करता येईल. 
    - संजय केळकर, आमदार, भाजप

बहुमत असतानाही केवळ काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद मिळणार म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेच आता स्वबळाचा नारा देत काँग्रेसवर टीका करीत आहेत. ही रंग बदलणारी नवीन जात त्यांची आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ते अशी भूमिका घेत आहेत. 
    - नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे 

Web Title: Shinde Sena wants a grand alliance; but BJP is a salt shaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.