आनंद आश्रमचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा; जोरदार शक्ती प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:04 PM2022-06-29T20:04:00+5:302022-06-29T20:04:15+5:30
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकनाथ शिंदे यांनी पुकारेल्या बंडानंतर त्यांना आता पहिली सत्ता आणलेल्या ठाण्यातून देखील पाठींबा मिळत आहे. शिंदे समर्थक रस्त्यावरुन त्यांना पाठींबा देत आहेत. परंतु आता याच शिंदे समर्थकांनी शिवसेनेच्या अर्थात आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमचा देखील ताबा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मानणारे समर्थक याबाबत काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट देखील आम्हीच शिवसैनिक असल्याचे सांगत शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. त्यानुसार त्यांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले. तसेच शक्तीप्रदर्शनातून देखील त्यांनी ताकद दाखवून दिली. दुसरीकडे आनंद आश्रम जवळ देखील सोमवारी याच शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्यासह महिला पदाधिका:यांना देखील याच आनंद आश्रम जवळ शक्ती प्रदर्शन केले. याच माध्यमातून शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमचा ताबा घेण्यास सुरवात केल्याचे दिसत होते. परंतु हा ताबा घेत असतांना शिवसैनिकांनी अद्यापही त्याला कोणत्याही स्वरुपाचा विरोध केलेला दिसून आलेला नाही.
दरम्यान शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेले आनंद आश्रम या वास्तूला ठाणो शहरातील शिवसेना पक्षाच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. याच आनंद आश्रमातून धर्मवीर आनंद दिघे न्यायनिवाडा करत, ज्या वास्तूतून अनेक महत्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. परंतु त्याची पडझड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षापासून सुरु आहे. आता हे काम जवळ जवळ पूर्ण झालेले आहे. परंतु आता शिवसेनेत दोन गट झाल्याने आता आनंद आश्रम कोणाचा असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु आनंद आश्रम आमचाच म्हणत शिंदे समर्थकांनी या वास्तुचाही आता ताबा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांचे शिवसैनिक याला कसे प्रतिउत्तर देणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.
आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतून कुठेही गेलेलो नाही. आनंद आश्रमच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते कसे सुरु आहे, याची केवळ पाहणी करण्यासाठी आम्ही आनंद आश्रमात जमा झालो होतो.
(संजय मोरे - माजी महापौर, ठाणे)