मेघडंबरीचे लोकार्पण : शिंदेही गटबाजीपुढे हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 11:16 PM2020-02-16T23:16:28+5:302020-02-16T23:16:52+5:30
मेघडंबरीचे लोकार्पण : उपनगराध्यक्षांच्या प्रश्नामुळे निर्माण झाले होते वादळ
अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचा लोकार्पण सोहळा शनिवारी रात्री नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपासून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अशा दोन गटांत सोशल मीडियावर वाद सुरू होता. उपनगराध्यक्षांनी मेघडंबरीवरून काही प्रश्न उपस्थित केल्याने वाद पेटला होता. अखेर, या गटातटांच्या राजकारणाला लगाम घालण्याचा सल्ला खुद्द शिंदे यांना द्यावा लागला. मात्र, त्यांचा हा सल्ला कितपत स्वीकारला जाईल, याबाबत मात्र अद्यापही शंकाच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नव्याने उभारण्यात आलेल्या दगडी मेघडंबरीच्या कामाला उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी अंशत: विरोध केला. बिल्डरकडून हे काम करून घेतल्याचे कारण पुढे करून वाद निर्माण करण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्ष आणि शहरप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी शेख यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर अपप्रचारही करण्यात आला. या कार्यक्रमाला खुद्द शिंदे येणार असल्याची कल्पना असतानाही हा वाद वाढल्याने अखेर शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. गटबाजी विसरून शहर विकासाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांना व्यासपीठावरून करावी लागली. अर्थात, हा सूचक सल्ला नेमका कुणाला होता, याची कल्पना उपस्थितांना आली होती. लोकार्पण सोहळा झाल्यावर स्वत: उपनगराध्यक्ष हेही त्या कार्यक्रमाला हजर होते. मात्र, शिंदे व्यासपीठावर असल्याने शेख यांना कोणताही विरोध त्या वेळेस झाला नाही. मात्र, एकमेकांवरील संताप मात्र सर्वज्ञात आहे. अंबरनाथमधील गटबाजी ही शिंदेंना माहीत असतानाही त्यांनी आपल्या भाषणातून केवळ सल्ला देत दोन्ही गटांना अप्रत्यक्ष झापले. मात्र, हा वाद कायमचा मिटविण्यासाठी कोण पुढाकार घेणार की नाही, हा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही.
दरम्यान, शिवाजी महाराज चौकात खाजगी विकासकाकडून उत्तम दगडी कलाकृती उभारण्यात आली आहे. शिवाजी महाराज चौकाची शोभा वाढविण्याचे काम या मेघडंबरीच्या माध्यमातून झाले आहे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला विलंब झाल्याने चौकात गर्दी झाली होती.
...आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसले
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करत असताना अब्दुल शेख यांच्या विरोधाच्या भूमिकेवर काय मत व्यक्त करतात, याची प्रतीक्षा होती. मात्र, त्यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. मात्र, शहरात बांधकाम व्यावसायिक किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून, लोकसहभागातून अशा प्रकारची कामे झाली पाहिजे, असे मत व्यक्त करताच व्यासपीठावर उपस्थित असलेले शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या चेहºयावर स्मित हास्य दिसले. या हास्यामागचे कारण म्हणजे अब्दुल शेख यांनी खाजगी विकासकाच्या माध्यमातून काम करण्यास विरोध दर्शविल्याने त्याच्या विरोधाला अप्रत्यक्ष उत्तर शिंदेंनी दिले.