‘शिंदे आणखी दोन उमेदवार बदलणार’ Vs ‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:25 AM2024-04-08T11:25:16+5:302024-04-08T11:26:22+5:30
आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप ईशान्य मुंबईचा लोकसभा निडवणुकीचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीन उमेदवार बदलले आहेत. आणखी दोन उमेदवार बदलले जातील, असे भाकीत उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ईशान्य मुंबईत एका प्रचारफेरीदरम्यान आदित्य म्हणाले, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दक्षिण मुंबईची जागा मनसेला, भाजपला की शिंदे गटाला मिळणार हा तिढा सुटलेला नाही. शिंदे गटाने आधी सांगितले होते की, एकही खासदार निवडून नाही आला तर राजीनामा देईन. आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतादरसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कल्याणची जागा मिळवण्यासाठी सोबत असलेल्या पाच जणांचा बळी मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’
डोंबिवली : कुवतीप्रमाणे वक्तव्ये करा, आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्ये झेपत नसतील तर करू नका, असा हल्लाबोल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केला. लोकसभेच्या कल्याणच्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचा बळी दिला, ज्यांनी शिंदेंना दिली साथ त्यांचाच केला घात, असा आरोप ठाकरेंनी केला होता. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा नागपुरात करताच रविवारी डोंबिवलीत महायुतीमधील घटक पक्षांचा मेळावा पार पडला. मेळाव्याला तिन्ही पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतदारसंघाच्या बूथवर तिन्ही पक्षांचे ८० हजार कार्यकर्ते काम करतील. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येईल, अशा शब्दात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित आ. किसन कथोरे यांनी आम्ही भाजपसोबत आहोत असे सांगत कपिल पाटील यांच्याशी असलेल्या मतभेदांवर उत्तर देणे टाळले.