ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा योग्य- जितेंद्र आव्हाड

By जितेंद्र कालेकर | Published: March 12, 2024 09:31 PM2024-03-12T21:31:53+5:302024-03-12T21:32:57+5:30

'अजित पवार समर्थकांना ना जागांचा, ना उमेदवारीचा भरवसा'

Shinde's Shiv Sena's claim on the Lok Sabha seat in Thane is correct - Jitendra Awhad | ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा योग्य- जितेंद्र आव्हाड

ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा योग्य- जितेंद्र आव्हाड

ठाणे :ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेने सातत्याने जिंकलेली असल्यामुळे त्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाच दावा योग्य आहे. मात्र, भाजप ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. एकीकडे भाजप राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचून घेते, त्याचवेळी त्यांचे हात कापते, त्याचेच हे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असाेत की वसंतराव नाईक, काँग्रेसच्या सत्तेच्या काळात फाेडाफाेडीचे राजकारण नव्हते. सध्या महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे फाेडाफाेडीचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे निवडणुकीतील उमेदवारांची तिकीटे फायनल करीत हाेते. मात्र, आता त्यांना काेणती जागा आणि कुणाला उमेदवारी मिळेल, याची शाश्वती दिसत नसल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ येत्या १५ व १६ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

आव्हाड म्हणाले की, भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. मग, त्यांना इतरांचे पक्ष का फाेडावे लागत आहेत. पक्षनिष्ठेला संपविण्याचे काम भाजप करीत आहे. गद्दारी विरूद्धचा विद्राेह महाराष्ट्रात माेठा आहे. राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा परिवर्तन घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येक आमदाराने विधानसभेच्या उमेदवारीच्या आमिषाने पक्षांतर केले. विकासाकरिता पक्ष सोडले हे केवळ सांगण्यापुरते असल्याचे आव्हाड म्हणाले. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. बाहेरून येणाऱ्यांमुळे पुन्हा आम्हाला सतरंजी आणि पोस्टर लावायची कामे करावी लागणार असल्याची भीती भाजपचेच आमदार खासगीत व्यक्त असल्याने पक्ष निष्ठेला संपविण्याचे काम भाजपने केल्याची टीकाही आव्हाड यांनी केली.

भारत जोडो यात्रेचा मार्ग
१५ मार्च रोजी भारत जोडो यात्रा पालघरहून वाडामार्गे भिवंडीकडे येणार आहे. भिवंडी येथील वाटिकाशेजारी असलेल्या ग्रामपंचायत मैदानात ती थांबणार असून, १६ मार्च रोजी तेथून निघून खारेगाव टोलनाकामार्गे पारसिक रेतीबंदरहून मुंब्रा कौसा येथील वाय जंक्शनहून यात्रेला पुन्हा सुरुवात होणार आहे. कौसा - मुंब्रा मार्गक्रमण करीत खारेगाव कळवा, जांभळी नाका येथे येणार आहे. त्यानंतर राहुल यात्रेत सहभागी झालेल्या जनतेला संबोधित करतील. नंतर टीपटाॅप प्लाझा येथे कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुढे दादर चैत्यभूमीकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती भारत जोडो यात्रेचे समन्वयक तथा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे हेही उपस्थित हाेते.

Web Title: Shinde's Shiv Sena's claim on the Lok Sabha seat in Thane is correct - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.