शिवसेनेच्या गडावर शिंदेंची मजबूत पकड; विरोधक उमेदवाराच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:04 AM2019-09-14T03:04:08+5:302019-09-14T06:36:17+5:30
एकनाथ शिंदे यांनी मंत्री या नात्याने कोपरी-पाचपाखाडीच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत.
पंकज रोडेकर
ठाणे : कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्यासह काही अंशी महाराष्ट्राचीही जबाबदारी आहे. स्वत:चा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ सांभाळतानाच त्यांना जिल्ह्यातील इतर मतदारसंघांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. सत्तासमीकरण जुळून आले, तर शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत व्यापक अर्थाने पणाला लागली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंत्री या नात्याने कोपरी-पाचपाखाडीच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. किंबहुना, पालकमंत्री या नात्याने शिंदे यांचा मतदारसंघ हा ठाणे शहर किंवा संपूर्ण जिल्हा असल्याने समृद्धी महामार्गापासून विविध उड्डाणपुलांच्या कामांपर्यंत आणि मेट्रो रेल्वेपासून महापालिकांच्या विविध विकासकामांपर्यंत अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. कोपरी-पाचपाखाडीसह ठाणे जिल्ह्याच्या एकूणच निकालावर त्यांचे हे निर्णय प्रभाव टाकणार आहेत.
शिंदे हे शिवसेनेत घट्ट पाळेमुळे असलेले नेते आहेत. ठाण्यातील संघटनात्मक बांधणीवर त्यांची घट्ट पकड आहे. शिवसेनेचा मराठी मतदार हा मुंबईपेक्षा ठाणे जिल्ह्यात जास्त आहे. अन्य पक्षांतील काही संभाव्य उमेदवारांना पक्षात आणण्यासाठी, तसेच निवडून आणण्यासाठी शिंदे रसद पुरवणार आहेत. त्यामुळे ते केवळ एका मतदारसंघाचे उमेदवार नसून महाराष्ट्र हाच त्यांचा मतदारसंघ असणार आहे. बहुभाषिक मतदारसंघ असतानाही शिवसेनेची येथील ताकद नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक सर्वाधिक असून, त्याखालोखाल भाजपचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही नगरसेवक या मतदारसंघात नाही.
पाच वर्षांत काय घडले?
- कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपशी संघर्ष होऊनही शिंदे यांनी शिवसेनेची सत्ता स्थापन केली.
- ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या सत्तास्थापनेपासून कधीही प्राप्त न झालेले संपूर्ण बहुमत मागील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेला प्राप्त झाले.
- ठाणे जिल्हा परिषदेतही शिवसेनेची सत्ता स्थापन करून जिल्ह्यातील ग्रामीण भागावर तितकेच प्रभावीपणे वर्चस्व प्राप्त केले.
- ठाणे जिल्ह्यात विविध विकासाचे प्रकल्प उभारण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर केला. यामध्ये समृद्धी महामार्ग, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, उड्डाणपूल यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
एका वाक्यात उत्तर द्यायचे तर नाव मोठे आणि लक्षण खोटे असे आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन फक्त स्वप्न दाखवली आहेत. या मतदारसंघात एकही प्रोजेक्टिव्ह काम दाखवावे. क्लस्टर करणार आहेत, पण ते केले नाही. स्वत:च आपला सत्कार करून घेतला आहे. क्लस्टरला लोकांचा विरोध आहे. - मनोज शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष