मीरा भाईंदर मतदारसंघावर शिंदेसेनेचा दावा; भाजपसह आमदार गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी 

By धीरज परब | Published: October 12, 2024 11:46 PM2024-10-12T23:46:22+5:302024-10-12T23:46:50+5:30

विद्यमान आमदार गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी या पत्राद्वारे केली गेली आहे . 

Shindesena Claims Mira Bhayander Constituency set back for MLA Geeta Jain with BJP  | मीरा भाईंदर मतदारसंघावर शिंदेसेनेचा दावा; भाजपसह आमदार गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी 

मीरा भाईंदर मतदारसंघावर शिंदेसेनेचा दावा; भाजपसह आमदार गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी 

लोकमत न्यूज नेटवर्क, धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला यावा आणि येथून विक्रम प्रताप सिंग यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शहरातील शिवसेना शिंदेगटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे . भाजपसह विद्यमान आमदार गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी या पत्राद्वारे केली गेली आहे . 

मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख राजू भोईर , महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर ,  मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र महिला संघटक  रिया म्हात्रे, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर  व संघटक पूजा आमगावकर यांच्या सह्या केलेला ठरावात हि मागणी केली गेली आहे .  शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणी नुसार मीरा भाईंदर शहरात अधिक मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेचा जनाधार प्रचंड प्रमाणात वाढला आहे.  सनातन राष्ट्र संमेलनात गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केल्याने सनातनी हिंदू धर्मीयांमध्ये शिवसेना पक्ष व मुख्यमंत्री यांच्याबद्दल आदर वाढला आहे असे ठरावात नमूद आहे . 

मीरा भाईंदरचा अर्धा भाग ओवळा माजिवडा मतदारसंघात  आ. सरनाईक यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला असून शिवसेना तळागाळात पोहोचून जनसेवा करीत आहे. १४५ मीरा भाईंदर विधानसभा हा तसा कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही. मीरा भाईंदर शहरात मुख्यमंत्री म्हणून आपण मंजुरी दिलेली व लोकांना दिसत असलेली, पूर्ण झालेली मोठमोठी विकासकामे तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांचा शिवसेनेकडे वाढत चाललेला ओघ पाहता १४५ मीरा भाईंदर विधानसभा हा मतदारसंघ शिवसेना पक्षाने लढवायला हवा.  या विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख विक्रमप्रताप सिंग यांनी गेल्या दोन वर्षात आ. सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा जनसंपर्क वाढवला आहे . सर्व जाती धर्माच्या लोकांचे त्यांना समर्थन मिळत आहे . त्यामुळे १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन या मतदारसंघातून विक्रम प्रताप सिंग यांना महायुतीची उमेदवारी द्यावी असा ठराव केल्याचे पत्रात नमूद आहे . 

आ. सरनाईक यांच्या निर्देशाने असा ठराव स्थानिक शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असावा याची दाट शक्यता आहे .   कारण मीरा भाईंदर शिवसेनेतील सर्व निर्णय आ . सरनाईक घेत असतात . त्यांच्या निर्देश व मंजुरी शिवाय सेनेत पान हलत नाही . 

मीरा भाईंदर मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपा मध्ये रस्सीखेच आहे . माजी आमदार नरेंद्र मेहता , ऍड . रवी व्यास प्रमुख दावेदार आहेतच पण अपक्ष आमदार गीता जैन देखील भाजपातुन उमेदवारीचा प्रबळ दावेदार आहेत . आ . जैन यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे त्यावेळचे आमदार मेहता यांना पराभवाची धूळ चारली होती . आ . जैन ह्या एकीकडे भाजपा सोबत तर दुसरी कडे शिवसेना शिंदे गटा सोबत देखील आहेत . ठाकरे सरकार पाडले गेले तेव्हा आ . जैन ह्या शिंदेगटासोबत गुवाहाटीत होत्या . आजही त्या थेट मुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत . 

आ . सरनाईक यांचे सुरवातीला आ . जैन यांच्या सोबत जमत होते . परंतु मध्यंतरी त्यांच्यात बिनसले असल्याची चर्चा आहे . आ . सरनाईक आणि मेहता यांच्यात टोकाचे वाद - आरोप एकीकडे झालेले आणि दोघांनी एकमेकांची स्तुती केल्याचे देखील शहराने पाहिले आहे . मेहता यांनी आमदार असताना बाळासाहेब ठाकरे कलादालन पासून आ .सरनाईक यांच्या अनेक विकासकामांना खो घालण्याचा प्रयत्न केला होता . इतकेच काय तर पालिका परिवहन ठेकेदाराच्या लाच प्रकरणात आ.  सरनाईक यांना गोवण्याचा प्रयत्न झाला होता . 

भाजपातील चढाओढ , मेहतांचा आलेला अनुभव आणि आ . जैन यांचे दोन्ही बाजूला हात असल्याने आ . सरनाईक यांनी विक्रम प्रताप यांना पूर्वीच मीरा भाईंदर विधासनभेतून तयारी करण्यास सांगितले होते . त्यानुसार विक्रम यांनी गेल्या काही काळा पासून तयारी देखील चालवली आहे . शिंदेसेनेने मीरा भाईंदर मतदार संघावर दावा करत विक्रम यांना उमेदवारी देण्याचा ठराव करत भाजपातील इच्छूकांसह आ . गीता जैन यांची कोंडी करण्याची खेळी खेळली आहे . शिवाय येणारी मीरा भाईंदर महापालिका निवडणूक जिंकण्यासह ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे . 

मुंबई , ठाणे , पालघर जिल्ह्यात उत्तरभारतीय मतदारांची संख्या मोठी आहे . मीरा भाईंदर मध्ये तसेच आ . सरनाईक यांच्या ओवळा माजिवडा मतदार संघात देखील उत्तर भारतीय  मतदार लक्षणीय आहेत . विक्रम प्रताप यांच्या रूपाने उत्तरभारतीयास विधानसभेची उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा मीरा भाईंदर सह लगतच्या अन्य मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना होऊ शकतो अस्से गणित आहे . जैन - मेहता यांच्यातील वादाचा फायदा घेत त्यांचा पत्ता कापण्यासह भाजपा कडून मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघ खेचून घेऊन सेनेची ताकद वाढवण्याचे डावपेच या मागे असल्याचे मानले जाते .

Web Title: Shindesena Claims Mira Bhayander Constituency set back for MLA Geeta Jain with BJP 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.