काव्यनिर्मिती होण्यासाठी अनुभवांची शिदोरी महत्वाची - कवी अशोक बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 03:33 PM2018-05-13T15:33:32+5:302018-05-13T15:33:32+5:30
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी ( साद ) यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय , सरस्वती सभागृह,येथे कवी अशोक बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोंदे , स्वरूपाराणी उबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ठाणे : " काळावर ठसा उमटविणारी कविता निर्माण होण्यासाठी अनुभवांची ' शिदोरी ' महत्वाची आहे.' असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशन आणि संवाद - सृजन प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी प्रसाद कुळकर्णी यांच्या 'शिदोरी' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे, स्वरूपाराणी उबाळे ,कवी प्रसाद कुळकर्णी, प्रकाशक संतोष राणे ई. मान्यवर उपस्थित होते.
अशोक बागवे पुढे म्हणाले " , शोकाचे रूपांतर श्लोकात करण्याची प्रतिभा कविंमधे असते. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जो अनुभव आपण घेतो तो योग्य अभिव्यक्तिद्वारे मांडणे म्हणजे कविता होय. कविने अनुभवांच्या वेणेतून गेल्याशिवाय उत्कृष्ट काव्यनिर्मिती होणार नाही. केवळ नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी कवितेतून लागणारे फलक आणि ते लावणारे नंतर गायब होतात . कारण त्यात सिद्धिपेक्षा प्रसिद्धि महत्वाची असते. खरा कवी प्रसिद्धिच्या मागे लागत नाही . त्याची कविताच त्याला प्रसिद्ध करते." कवी प्रसाद कुळकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ", शिदोरी काव्यसंग्रहातील विविध कविता मुंबईच्या ट्रैफिक मधे सुचल्या आहेत. ट्रैफिक मुळे तासनतास गाडीत अडकल्यानंतर चिड़चिड़ कण्यापेक्षा ' मना शांत हो' असे शब्द उमटू लागले. त्यामधूनच कवितेच्या निर्मितीचे सूत्र गवसले. ट्रैफिकमुळे चिडूंन न जाता मनातल्या मनात स्फुरलेल्या ओळी पाठ करून घरी आल्यावर लिहून काढू लागलो . त्यामुळेच शिदोरी काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. यावेळी डॉ. महेश पाटील, आशा दोन्दे , स्वरूपाराणी उबाळे , प्रकाशक संतोष राणे यांचीही भाषणे झाली . सचिन पेंडसे, बलका मुखर्जी , प्राजक्ता देशमुख , योगेश कुळकर्णी , प्रसाद कुळकर्णी यांनी शिदोरी काव्यसंग्रहातील कवितांचे काव्यगायन केले .