सोन्याचे दागिने घेऊन पळणाऱ्या रिक्षा चालकास शिताफीने अटक ,आठ लाखांचे दागिने हस्तगत
By जितेंद्र कालेकर | Published: January 12, 2023 07:15 PM2023-01-12T19:15:54+5:302023-01-12T19:16:30+5:30
बँकेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका दाम्पत्याची दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली.
ठाणे : बँकेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका दाम्पत्याची दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली. ही बॅग घेऊन पसार झालेला रिक्षा चालक शिवप्रसाद गुप्ता (३७, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून आठ लाख आठ हजारांचे दागिने आणि रिक्षाही जप्त केली आहे.
ठाण्यातील एक दाम्पत्य ९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील आयसीआयसीआय या बँकेत दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी रिक्षाने गेले होते. ते बँकेसमोर रिक्षातून उतरत असतानाच चालकाने रिक्षातील बॅग घेऊन रिक्षाने पळ काढला. दाम्पत्याने या प्रकरणी त्वरित नौपाडा पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. धुमाळ आणि निरीक्षक आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार राजेंद्र गायकवाड, सचिन रांजणे, गोरखनाथ राठोड आणि जयेश येळवे आदींच्या पथकाने घटनास्थळ ते रिक्षा चालक पळून गेलेल्या दिशेने असलेल्या तब्बल ३५ सीसीटीव्हींची पाहणी केली.
एका सीसीटीव्हीमध्ये ही रिक्षा आढळल्यानंतर तिचा क्रमांक काढण्यात आला. त्यानंतर चालकाचा मोबाईल क्रमांक काढण्यात आले. तो शिवप्रसाद हा चालक लोकमान्यनगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्याची ओळख पटल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने या गुन्हयाची कबूली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. दागिन्यांच्या बॅगेसह गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली.