शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या नुबैरशाह शेखला बुद्धीबळात जगज्जेता व्हायचय
By जितेंद्र कालेकर | Published: February 13, 2018 08:44 PM2018-02-13T20:44:15+5:302018-02-13T20:53:53+5:30
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह शेख याला जाहीर झाला आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्याचा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह सलीम शेख याला राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने आतापर्यत राज्य तसेच आंतराष्टÑीय स्तरावर केलेल्या बुद्धीबळाच्या खेळातील दैदिप्यमान कामगिरीची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे.
ठाण्याच्या मो. ह. विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या नुबैरशाह सध्या मुंबईच्या एम. एच. साबु सिद्धीकी अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीच्या तृतीय वर्षात शिकत आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासून २००४ मध्ये त्याने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली येथे (जुलै २०१७) राष्टÑकुल युवा बुद्धीबळ स्पर्धेत त्याने ‘सुवर्णपदक’ पटकविले. तर राष्टÑकुल (वरिष्ठ) बुद्धीबळ स्पर्धेत १५ क्रमांक पटकविला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जागतिक जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून ‘इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबही त्याला मिळाला आहे. आॅक्टोंबर २०१६ मध्ये राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्टÑीय ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकून २०१७ च्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. वयाच्या आठव्या वर्षापासूनच आशियाई, जागतिक आणि राष्टÑकुल युवा बुद्धीबळ स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. आतापर्यंत जागतिक, आशियाई तसेच राष्टÑकुल युवा बुद्धीबळ स्पर्धेत भारतास चार सुवर्ण, सहा रौप्य तर पाच कांस्य अशी १५ आंतरराष्टÑीय पदके त्याने जिंकून दिली आहेत. भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित होणा-या सहा राष्टÑीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड होणारा महाराष्टÑातील तो एकमेव खेळाडू आहे. ३४ वेळा अजिंक्यपद पटकावणा-या नुबैरशाहला आतापर्यंत २८० स्पर्धांमधून २५१३ सामने खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव मिळविला आहे. इराण, श्रीलंका, सिंगापूर, व्हिएतनाम, ग्रीस, फिलीपाईन्स, चीन, अमेरिका, थायलंड, स्कॉटलंड आणि रशिया आदी देशांमधील आंतराष्टÑीय स्पधेत त्याने भाग घेतला आहे.
राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे अत्यानंद होत असून आतापर्यंतच्या कामगिरीची शासनाने दखल घेतल्याबद्दल खूप आनंद होत असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना त्याने सांगितले. आगामी जागतिक ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत कामगिरी उंचावून भारतास पदक मिळवून द्यायचे असून सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे.