शिवजयंतीलाही आचारसंहितेचा फटका, शहरात संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:56 AM2019-03-20T03:56:09+5:302019-03-20T03:56:28+5:30
शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे.
ठाणे - शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे. या उत्सवात सर्वपक्षीय नेते आणि ठाणेकर सहभागी होत असतात. त्यातून कोणताही निवडणूक प्रचार होत नाही किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचेही प्रयत्न होत नाहीत. परंतु, असे असतानाही पालिकेने अचानक अशा प्रकारचे पाऊल उचलण्याने शिवभक्तांत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्यावतीने २३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. मासुंदा तलावापासून निघाणारी ही मिरवणूक बाजारपेठेतून मार्गक्र मण करून गडकरी रंगायतन येथे विसर्जीत केली जाते.
शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ठाण्यातील मान्यवर या सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता असल्याने पालिकेने शिवजयंती साजरी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्र ीया व्यक्त होत आहेत.
आचारसंहिता लागू असताना पालिका वेगवेगळ्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करत आहे. यापूर्वी आचारसंहिता असतानाही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपुजन सोहळेसुद्धा पार पडले होते. मात्र, आता आचारसंहितेच्या नावाखाली परंपरागत शिवजयंती सोहळा रद्द करण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. या सोहळ्यातून कोणताही राजकीय पक्षाचा प्रचार केला जात नाही. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली सोहळा रद्द करणे योग्य नाही. प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.
- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपा
आचारसंहितेच्या काळात राजकीय कार्यक्रमांवर बंदी असते. मात्र, कदाचित राजकारणी मंडळी शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकरणासाठी करतात हे कदाचित पालिकेच्या लक्षात आले असावे म्हणूनच अशा पद्धतीने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. परंतु, पालिकेने या निर्णयाचा फेरविचार करावा.
- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते-ठामपा)