कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:45 AM2020-03-13T00:45:58+5:302020-03-13T00:46:13+5:30

ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, शिवचरित्रावर आधारित देखावे सादर

Shiv Jayanti cheers in Thane despite the coroner's knot; Chitrarath proved to be an attraction | कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

googlenewsNext

ठाणे : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचे सावट असतानाही ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार येणारा शिवजयंती उत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात, बॅण्ड पथकांचे सुरेल सूर, आकर्षक चित्ररथ, शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात हा उत्सव साजरा झाला.

सध्या कोरोनाचे सावट असल्याने गर्दी टाळावी, मिरवणुका काढू नयेत, तसेच इतर काळजीही घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि पोलिसांमार्फतही केले आहे. त्यामुळे याचा परिणाम शिवजयंती उत्सवावर होईल, असे प्रारंभी वाटत होतो. परंतु असे असताना ठाण्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरु वात गुरुवारी सकाळी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक नरेश मणेरा, उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकही या उत्सवात सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांकडून अभिवादन
राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आमदार, खासदार, नगरसेवकांच्या उपस्थितीत मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पालखीमधील शिवप्रतिमेचे विधिवत पूजन केल्यानंतर भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, बॅण्ड पथके, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण, आकर्षक चित्ररथ अशा विविधरंगी मिरवणुकीने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीवर कोरोनाचे सावट आहे, असे कुठेही दिसून आले नाही.

Web Title: Shiv Jayanti cheers in Thane despite the coroner's knot; Chitrarath proved to be an attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.