शिवप्रेमींमध्ये जल्लोष, ठाण्यातही ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:48 AM2020-02-20T01:48:43+5:302020-02-20T01:49:01+5:30

ठाण्यात शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन

Shiv lovers announce 'Jal Bhavani, Jai Shivaji' in Jalosh, Thane | शिवप्रेमींमध्ये जल्लोष, ठाण्यातही ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोष

शिवप्रेमींमध्ये जल्लोष, ठाण्यातही ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोष

Next

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहरांसह ग्रामीण भागात मिरवणुका काढण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींनी सहभाग घेतल्याने रस्ते गजबजले होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या गर्जनेने संपूर्ण
परिसर दुमदुमला होता.

ठाण्यात शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन
ठाणे : कोपरी येथे ठाणे काँग्रेसने शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये दुर्मीळ नाणी, नोटा, पोस्टर, पोस्टाची तिकिटे, हस्तलिखिते, दुर्मीळ वस्तू, तोफांचे गोळे, शिवकालीन शस्त्रास्त्रे अशा विविध मौल्यवान वस्तू प्रदर्शनात ठेवल्या होत्या. कोपरी ब्लॉकचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या वतीने ठाणे पूर्व, आनंद सिनेमानजीक शिवतीर्थ ग्रुपने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इतिहास जपण्याच्या प्रयत्नातून नागरिकांना इतिहासकालीन वस्तूंची माहिती व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील अनेक इतिहासप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन शिवकालीन वस्तूंची माहिती घेतली. यामध्ये सुमारे ५०० पुरातन नाण्यांचा समावेश असून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी केलेल्या तुलेतील दुर्मीळ सुवर्णहोनदेखील प्रदर्शित केले आहे. कार्यक्र माच्या शुभारंभाकरिता सन्माननीय जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्र माला माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, माजी नगरसेवक सुरेश जाधव, रमेश पाटील, महेंद्र म्हात्रे, बाबा शिंदे, ज्ञानबा पाटील, नाना कदम, राम तपकीर, मनोज जाधव, संजय यादव, शेख भाई, गोविंद शर्मा, निलेश अहिरे, योगेश महेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भिवंडीत शिवजयंती उत्साहात

भिवंडी : शहर व ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातील खारबाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ओम साई शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यापासून मिरवणूक काढली.
शिवसेना शाखा कामतघर व सकल मराठा समाजाच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ््यास पालिका प्रशासन, पोलीस, सकल मराठा समाज व सामाजिक कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण केला. महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, साईनाथ पवार, सुभाष माने आदी उपस्थित होते. अजयनगर मिरवणूक काढण्यात आली. कामतघर येथे शिवसेना नगरसेवक मनोज काटेकर यांच्या पुढाकाराने मिरवणूक काढली.


शिवजयंतीनिमित्त विनामूल्य रिक्षासेवा
बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवभक्त सुजित मंडलिक याने बदलापूर पश्चिममध्ये नागरिकांना सकाळी १० ते ४ पर्यंत मोफत रिक्षा प्रवासाची सुविधा दिली. मंडलिक यांनी आपल्या रिक्षावर तशा आशयाचा फलक लावला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बदलापूरमध्ये विविध कार्यक्र म झाले. त्याचवेळी मंडलिक यांनी बुधवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. बदलापूर पश्चिमेतील बहुतांश नागरिक रिक्षानेच प्रवास करतात. वडवली, बेलवली येथील नागरिकांसाठी ही सेवा होती. आपल्या रिक्षावर भगवा ध्वज आणि विनामूल्य रिक्षासेवेचे स्टीकर लावले होते. मंडलिक यांच्या सेवेचे प्रवाशांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती
डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर प्राथमिक शाळेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकरल्या होत्या. गड-किल्ले बांधण्याच्या उपक्रमांतर्गत वर्गशिक्षक छबिलदास नाठे यांनी इयत्ता पाचवीच्या प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांचे आठ गट पाडले होते. त्यानुसार किल्ले रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पन्हाळा, कोंढाणा आदी किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली.

विद्यार्थी सकाळपासूनच दगड, माती गोळा करत किल्लेबांधणीत मग्न होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या किल्ल्यांची नावे व माहितीचे तक्ते आणले होते. मावळे व शिवरायांच्या प्रतिमा उभारल्या गेल्या होत्या. इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी, शिक्षकांसमवेत मुख्याध्यापिका शैलजा चौधरी यांनी किल्ले प्रदर्शनाला भेट दिली. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी यश महाडिक याने शिवाजी महाराज व अफजल खान वधाचा पोवाडा जल्लोषात सादर केला. त्यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्हिडिओ चित्रफीत दाखविण्यात आली, अशी माहिती योग शिक्षक एकनाथ पवार यांनी दिली.

Web Title: Shiv lovers announce 'Jal Bhavani, Jai Shivaji' in Jalosh, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे