युती झाल्याने शिवसैनिक राहिले गाफील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:14 AM2019-04-30T01:14:29+5:302019-04-30T06:33:25+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्याने मागील विधानसभा निवडणुकीत त्वेषाने रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक सोमवारी ठाणे, डोंबिवलीत दिसला नाही
ठाणे : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्याने मागील विधानसभा निवडणुकीत त्वेषाने रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक सोमवारी ठाणे, डोंबिवलीत दिसला नाही. मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत नेण्याचे शिवसेनेचे व्यवस्थापन प्रभावीपणे राबवताना शिवसैनिक दिसले नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या स्लिप घरपोच करणारी शिवसेना यंदा कमी पडलेली दिसली. त्यामुळे मतदारांची संख्या वाढूनही मतांचा टक्का लक्षणीय वाढलेला दिसला नाही. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा
मतदारसंघांतील मतांची टक्केवारी ही २०१४ मधील मतांच्या टक्केवारीच्या जवळपास बरोबर राहिली. काही विधानसभा मतदारसंघांत ती गेल्या वेळीपेक्षा वाढली, तर काही मतदारसंघांत ती कमी झाली.
मागील वेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती व लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढली होती. शिवाय, मतदारांनी मतदान करावे, याकरिता निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली होती. त्यामुळे मतांची टक्केवारी ही गतवेळेपेक्षा किमान दोन ते तीन टक्क्यांनी वाढेल, अशी अपेक्षा होती. मतदारांना स्लिपचे वाटप नाही. ठाणे जिल्ह्यातील पारा गेले तीन दिवस बराच वाढला असून, सापेक्ष आर्द्रता वाढल्याने कमालीचे उकडत आहे. त्यामुळे मतदानकेंद्रांवर रांगा लावून, घाम पुसत मतदान करण्याची तोषिश काहींनी सहन करण्याचे टाळले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली किंवा कल्याणसारख्या शिवसेनेचे संघटनात्मक जाळे भक्कम असलेल्या शहरांतील मतदारांनाही मतदानाची पूर्वसूचना देणाऱ्या स्लिप सेनेकडून मिळाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अनेक ठिकाणी बुथ लागले नव्हते. त्यामुळे त्या पक्षाकडून स्लिप मिळतील, ही अपेक्षा करणे फोल होते.
निवडणूक आयोगही मतदारांना मतदान कुठे आहे, हे सांगणाऱ्या स्लिप वाटतो. मात्र, कल्याण लोकसभा मतदारसंघात आयोगानेही त्या वाटण्याची दक्षता घेतली नाही. त्यामुळे अनेक मतदारांना आपले मतदान नेमके कुठे आहे, हेच ठाऊक नव्हते आणि मतदारांनीही ते शोधून काढण्याचे कष्ट घेतले नाहीत. ठाण्यात सेनेच्या व्यवस्थापनाचा अभाव ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ वगळता अन्यत्र शिवसैनिक मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत घेऊन जाण्याची धडपड करत आहेत, असे दिसले नाही. युती झाल्यामुळे निर्माण झालेला अतिआत्मविश्वास यामुळे मतांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला गेला नाही, अशी चर्चा आहे.
मनसेचे मतदारही घरी बसले? : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून दूर करण्याकरिता मतदान करण्याचे आवाहन केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घड्याळ किंवा पंजाचे बटण दाबणे हे स्वीकारार्ह असले, तरी ठाणे, कल्याण व भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत मनसेला मानणारी प्रत्येकी सुमारे लाखभर मते आहेत. या मतदारांचा पिंड हा हिंदुत्वाकडे कल असणारा व मनसेच्या खळ्ळखट्याक शैलीचा मोह असलेला आहे. या मतदाराला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटण दाबताना जीवावर आल्याचे काही मनसे पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे मनसेचे मतदार हेही मतदानापासून दूर राहिले असण्याची किंवा त्यांनी थेट ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याची शक्यता आहे.
युती झाली तरी मतदार नाराज गेली साडेचार वर्षे परस्परांवर टीका करणारे शिवसेना- भाजप हे पक्ष संख्याबळ कमी होऊ नये, याकरिता एकत्र आले खरे. मात्र, जेथे शिवसेनेचा उमेदवार आहे, तेथे भाजप व प्रामुख्याने रा.स्व. संघाची विचारधारा मानणाऱ्या मतदारांनी किती उत्साहाने मतदान केले, याबाबत साशंकता आहे. हीच बाब शिवसैनिकांबाबतीत घडली. भाजपवर प्रच्छन्न टीका केल्यानंतर सत्तेत बसलेल्या काही मोजक्या नेत्यांच्या आग्रहाखातर केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींना रुचलेली नाही. त्यामुळेही मतांचा टक्का कमी झाल्याची चर्चा आहे. तशी नाराजी काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलून दाखवली.