ठाणे आंदोलनातील हिंसाचारात शिवसैनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:17 PM2018-07-26T23:17:12+5:302018-07-26T23:19:10+5:30

हिंसेमागे राजकारणाची चर्चा; ३८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, अमराठी तरुणांचाही सहभाग

Shiv Sainik in violence against Thane | ठाणे आंदोलनातील हिंसाचारात शिवसैनिक

ठाणे आंदोलनातील हिंसाचारात शिवसैनिक

Next

ठाणे : मराठा क्रांती मोर्चाच्या रास्ता रोकोनिमित्ताने बुधवारी नितीन कंपनीजवळ झालेली दगडफेक, सरकारी मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवरील हल्ले, दंगल याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांच्यासह ३८ जणांविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मंडळींनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाला अडचणीत आणण्याकरिता राडा केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून संपूर्ण ठाणे शहरात एकूण ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताच आयोजकांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर, ठाण्यात हिंसाचार तीव्र झाला. या आंदोलनाचा समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याचा दावा आयोजकांनी केला. त्याचवेळी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीबदलाची मागणी केली. मात्र, आता शिवसेनेच्या काही मंडळींना अटक झाल्याने या सर्व घटनांची सांगड घालता हे हेतुपुरस्सर कारस्थान असल्याची कुजबूज स्थानिक भाजपा नेते करू लागले आहेत.
बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितीन कंपनी येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दंगलीचा भडका उडाला.
जमावाच्या दगडफेकीत नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार लामतुरे, उपायुक्तांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि निलेश मोरे हे तीन अधिकारी जखमी झाले. या तिघांनाही उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नौपाडा पोलीस ठाण्यातील आरोपींची नावे-
माजी शिवसेना नगरसेवक शरद कणसे, शिवसेना शाखाप्रमुख अशोक कदम (रामचंद्रनगर), रोहित वीर, मंगेश बांदल, महेश अतकरे, दिनेश साठे, शुभम दरेकर, अजय पाटील, वैभव पाटील, युवराज अवघडे, संदीप गावडे, हेमंत कुमावत, आकाश पवार, शिवाजी पाटील, शैलेंद्र उतेकर, संदेश पवार, संदीप कुटे, योगेश पवार, अनिकेत जाधव, निखिल वाईकर, विघ्नेश भिलारे आणि प्रणाली गोविंद आदी २५ जणांचा यात समाावेश आहे. भिलारे हा एकमेव नौपाड्यातील चंदनवाडी येथील रहिवासी असून उर्वरित सर्वजण वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, पडवळनगर, धर्मवीरनगर आणि आनंदनगर चेकनाका येथील रहिवासी आहेत. कणसे आणि कदम हे दोघे ४८ वर्षीय, तर इतर सर्वजण १८ ते २८ वयोगटांतील आहेत. त्यांच्यावर सरकारी अधिकाºयांवर हल्ला करणे, एसटी, टीएमटी या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.

आंदोलन समान नागरी कायद्यासाठी
अटकेतील आंदोलकांपैकी अनेकांना कशासाठी आरक्षण हवे आहे, याचीही माहिती देता आली नाही. एकाने तर मराठा आरक्षण मिळण्याकरिता समान नागरी कायदा झाला पाहिजे, असे पोलिसांना सांगितले. तर, बहुतेकांनी आम्ही आंदोलनात नव्हतोच, अशी भूमिका घेतली.

आधीच्या शिस्तीमुळे पोलीस गाफील
यापूर्वी ठाणे शहरासह महाराष्टÑभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी शिस्तीचे दर्शन घडवत शांततेने ५७ मोर्चे काढले होते. हाच इतिहास पाहून ठाण्यातील पोलीस गाफील राहिले. त्यामुळेच पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.
नितीन कंपनीजवळ एका तरुणीला काही आंदोलकांनी घेराव घातला होता. काही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून नौपाड्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी तिची सुटका केल्याचे उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी सांगितले.

नेटकऱ्यांना त्रास
मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी हिंसक वळण घेतल्यानंतर गुरुवारी शेकडो जणांचे इंटरनेट बंद पडले होते. कालच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरली जाऊ नये, म्हणून पोलिसांनीच इंटरनेटवर प्रतिबंध आणल्याची चर्चा होती. परंतु, पोलिसांनी अधिकृतपणे नेटवर कोणतेही निर्बंध आणले नसल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वागळे इस्टेटमध्ये १३ जणांना अटक
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ, उपनिरीक्षक तायडे, हवालदार सुनील शेलार आणि मिलिंद जोशी हे चौघे पोलीस आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले, तर काहींनी सहायक आयुक्त निलेवाड आणि वरिष्ठ निरीक्षक अफजल पठाण यांच्याही सरकारी वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी सुमारे ३०० ते ३५० जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यापैकी दारा विक्रमादित्य चौहान, अंगद लालचंद चौहान, तेजस रेणुसे, सुनील पाटील, शिवाजी कदम, निखिल जाधव, अक्षय आंबेरकर, दीपेश बनवे, राहुल चौहान, रमण लाड, राजेश बागवे, विश्वास चव्हाण आणि किरण मोरे आदी १३ जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याव्यतिरिक्त मासुंदा तलाव भागात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी गौरव देशमुख (३०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक केली असून त्यातील अन्य एकाचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पो.नि. चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sainik in violence against Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.