उल्हासनगरात शिवसैनिकांचा संताप, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:33 PM2020-08-09T16:33:25+5:302020-08-09T16:36:51+5:30
कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
उल्हासनगर : कर्नाटक येथील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शिवाजी चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळला. तसेच, यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
उल्हासनगरमधील शिवाजी चौकात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगाव मनगुत्ती गावात बसविलेला पुतळा रातोरात कर्नाटक सरकारने हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजपा सरकार महाराष्ट्र व मराठी द्वेष्टे असून महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्याचे काम भाजपाच्या येदियुरप्पा सरकारने घेतल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. हटविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याजागी बसविण्यात यावा, अन्यथा कर्नाटकात जावून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, नगरसेवक शेखर यादव, युवा अध्यक्ष बाळा श्रीखंडे, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक आदी जन उपस्थित होते.