शिवसैनिकांनी दिला गर्दुल्यांना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:57+5:302021-09-06T04:44:57+5:30
ठाणे : गेले अनेक दिवस नौपाडा येथील भास्कर कॉलनी आणि जिजामाता उद्यान, कोपरी पूल याठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यामुळे परिसरातील ...
ठाणे : गेले अनेक दिवस नौपाडा येथील भास्कर कॉलनी आणि जिजामाता उद्यान, कोपरी पूल याठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते. याबद्दलच्या तक्रारी नौपाडातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर त्यांनी या गर्दुल्ल्यांना चोप दिला, तसेच पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
नौपाड्यातील भास्कर कॉलनी, जिजामाता उद्यानसमोरील कोपरी ते नौपाडा पोलीस स्टेशनपर्यंत जाणाऱ्या पुलाखाली सात ते आठ गर्दुल्ले नशापान करताना आढळतात. रात्रभर या गर्दुल्यांच्या मोठ्या आवाजात होत असलेल्या भांडणामुळे रस्त्याच्या आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांना प्रचंड त्रास होत असे. ही बाब सुरुची सोसायटीतील सुनील कुलकर्णी यांनी शिवसेनेचे नौपाडा उपविभागप्रमुख किरण नाकती यांच्या कानावर घातली. तत्काळ नाकती यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विजय डावरे, अशोक कदम, हर्षल आठवले, गजानन परब, संजय पवार, ऋषिकेश केदार, महेश सुतार व इतर शिवसैनिक पुलाखाली पोहोचले. त्यांनी सर्व गर्दुल्यांना चोप देऊन त्यांना सामानासहित हाकलून लावले. सध्या नौपाडा व आजूबाजूच्या परिसरातील वाढत असलेल्या चोऱ्यांचेसुद्धा हे मुख्य कारण असू शकते, असे नाकती म्हणाले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याची मागणी नाकती यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी केली. प्रशासनाने पुलाखाली असलेला मोकळा भाग ग्रीलचे कंपाऊंड अथवा योग्य प्रकारे बंद करावे, जेणेकरून त्या भागात जाणे अशक्य होईल, असे आवाहन शिवसेना नौपाडा विभागाच्या माध्यमातून नाकती यांनी केले.