एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी साजरा केला स्वाभिमान दिवस, ठाकरे गटाला प्रत्युत्तर
By अजित मांडके | Published: June 20, 2023 08:12 PM2023-06-20T20:12:18+5:302023-06-20T20:12:47+5:30
ठाण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
ठाणे: ठाण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील वर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरतेला रवाना झाले आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले होते. यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कडून गद्दार दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याला स्वाभिमान दिन साजरा करून शिंदे समर्थकाकडून उत्तर देण्यात आले.
एका वर्षांपूर्वी २० जून २०२२ ला रात्री आपल्या समर्थक ४० आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतला रवाना झाले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबल उडाली होती. त्यानंतर सत्तांतर होऊन राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेले होते. याचाच निषेध म्हणून मंगळवारी राज्यभर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गद्दार दिवस साजरा करण्यात आला. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या किसन नगर येथील शिवसेना शाखेसमोर जमत शिवसैनिकांनी स्वाभिमान दिवस साजरा केला. यावेळी फटाके फोडत लाडू वाटून आणि केक कापून आपला आनंदही व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे आणि धाकटे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे उपस्थित होते. यावेळी संभाजी शिंदे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.