बदलापूरमध्ये केंद्रीय मंत्र्याला शिवसैनिकांनी दाखविले काळे झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:42 PM2022-03-19T20:42:52+5:302022-03-19T20:43:11+5:30
पाटील हे बदलापुरात एका जिमखानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी शनिवारी बदलापुरात आले होते.
बदलापूर - केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे बदलापूरमध्ये एका क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी येणार असल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. पाटील हे बदलापुरात एका जिमखानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी शनिवारी बदलापुरात आले होते.
बदलापूरच्या हेंद्रेपडा परिसरामध्ये पालिकेच्यावतीने भव्य असे जिमखाना आणि क्रीडा संकुलाचे काम करण्यात आले आहे. याच कामांतर्गत जिमखानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होतो. त्याला विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हेंद्रेपाडा परिसरात कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.
याची कुणकुण पोलीस प्रशासनाला आधीच लागल्याने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच काळे झेंडे दाखवणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. माजी नगरसेवक राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या क्रीडा मैदानाचे आणि जिमखान्याचे काम करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यासाठी या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी शिवसेनेने निषेध व्यक्त केल्याने या कार्यक्रमाला गालबोट लागले.