निर्णायक आघाडी मिळताच शिवसैनिकांनी घेतली आनंदाश्रमाकडे धाव, आनंद दिघे यांच्या चरणी वाहिला विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:37 AM2019-05-24T01:37:50+5:302019-05-24T01:38:39+5:30

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली.

Shiv Sainiks take on Anandashram after winning the crucial lead | निर्णायक आघाडी मिळताच शिवसैनिकांनी घेतली आनंदाश्रमाकडे धाव, आनंद दिघे यांच्या चरणी वाहिला विजय

निर्णायक आघाडी मिळताच शिवसैनिकांनी घेतली आनंदाश्रमाकडे धाव, आनंद दिघे यांच्या चरणी वाहिला विजय

Next

- जितेंद्र कालेकर
ठाणे  - मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर, दुसरीकडे विचारे यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन विजयापूर्वीच जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमासमोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुरुवारी निकालापूर्वीच ‘आनंदोत्सव’ साजरा केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला घोडबंदर रोडवरील कासारवडवली, आनंदनगर येथील न्यू होरायझन स्कूलमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीला शिवसेना, भाजप युतीबरोबरच काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही जल्लोषाचे वातावरण होते. पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या विचारे यांनी २४ हजार ३०१ मते घेतली. तर, राष्टÑवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना ११ हजार ८२१ मते मिळाली. पहिल्याच फेरीमध्ये विचारे यांनी १२ हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. पुढे १० ते १८ व्या फेरीपर्यंतही त्यांनी ही आघाडी कायम ठेवली. अठराव्या फेरीमध्ये विचारेंना चार लाख ५६ हजार १८१ मते मिळाली. तर, परांजपे यांना एक लाख ९७ हजार २०२ मते मिळाली. यातही दोन लाख ५८ हजार ९७९ मतांची विचारेंना आघाडी मिळाली. त्यामुळे विचारेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करून शिवसेनेने टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमसमोर फटाक्यांची आतषबाजी करून धूमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांना पेढा भरवत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, आदी उपस्थित होते.

नेत्यांच्या हाती ढोल आणि बॅन्जोवर कार्यकर्ते थिरकले!
कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे छोटे कटआउट हाती घेऊन, तर काहींनी मोदी यांचे मुखवटे परिधान करून वंदे मातरम्... भारत माता की जय... मोदी मोदी... अशा घोषणाही कार्यकर्ते देत जल्लोषात सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅन्जो सुरू असताना आमदार केळकर यांनी ढोल हाती घेऊन तो वाजवला.
 

Web Title: Shiv Sainiks take on Anandashram after winning the crucial lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.