आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचे 'चप्पल मारो आंदोलन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:04 PM2020-02-04T13:04:37+5:302020-02-04T13:11:06+5:30
'कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही म्हणता, म्हणजे हे राज्य काय तुझ्या बापाचे आहे काय? '
डोंबिवली : भाजपाचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेकडून मंगळवारी डोबिंवलीत 'चप्पल मारो आंदोलन' केले. यावेळी शिवसैनिकांनी आशिष शेलार यांच्या फोटोला चप्पल मारत निषेध व्यक्त केला. तसेच, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याविषयी बोलताना आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी डोंबिवलीतील गोग्रासवाडी येथे आंदोलन केले. तसेच, आशिष शेलार यांच्या फोटोला चप्पल मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. याचबरोबर, आशिष शेलार हे महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिकडे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमूख भाऊ चौधरी यांनी आंदोलनादरम्यान दिला.
दरम्यान, गेल्या रविवारी नालासोपारा येथील एका कार्यक्रमात बोलताना, हा कायदा केंद्राचा आहे, कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही म्हणता, म्हणजे हे राज्य काय तुझ्या बापाचे आहे काय? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांनी केली होती. त्यानंतर चहुबाजूने त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी, कोणाचाही एकेरी उल्लेख केला नाही, मुख्यमंत्र्यांचा तर मुळीच नाही, असे सांगत भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो, असे म्हणत माफी मागितली आहे.