आंदोलनातून शिवसेना, भाजप आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:57 AM2021-02-06T03:57:51+5:302021-02-06T03:58:39+5:30
Thane News :
ठाणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमधून विस्तवही जात नाही. एकमेकांवर टीका करण्याची संधीही सोडत नाही. अशातच केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेलमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेने आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध केला. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने वाढीव वीजबिले पाठवल्याने भाजपने महावितरण कार्यालयांसमोर हल्लाबोल आंदोलन केले. एरवी शब्दातून दिसणारे हे दोन्ही पक्ष मात्र आज आंदोलनाच्या माध्यमातून आमनेसामने आल्याचे दिसले.
इंधन दरवाढीविरोधात हजारो शिवसैनिक उतरले रस्त्यावर
ठाणे : पेट्रोल, डिझेलच्या किमतीने आज शंभरी गाठली आहे, त्यामुळे देशात महागाईचा भडका उडणार आहे. ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगणाऱ्या मोदी सरकारवर जनतेने विश्वास टाकला. परंतु, हे अच्छे दिन कुठे आहेत, याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात बैलगाडी, घोडागाडी, सायकल घेऊन हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. आमदार रवींद्र फाटक, शहरप्रमुख रमेश वैती, हेमंत पवार, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर संजय मोरे, ठाणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख वंदना डोंगरे, उपशहरप्रमुख जगदीश थोरात, नगरसेविका निर्मला कणसे, नंदिनी विचारे आदी सहभागी झाले होते.
इंधन दरवाढ परवडणारी नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना केंद्र सरकारने त्यावर मीठ चोळण्याचे काम केले आहे. नागरिकांना बैलगाडी, घोडागाडी व सायकलचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. केंद्र सरकारने सरकारी सेवांचे खासगीकरण करणे, कृषी कायदा लादणे, घरगुती गॅसचे दर वाढविणे, नोटबंदी करून देशाला आर्थिक खाईत लोटत सर्वसामान्यांवर अन्याय केला आहे. त्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे सांगण्यात आले.
कोर्टनाका येथे अडवला मोर्चा
केंद्र सरकारने अर्थसंकल्पातही महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे येथील जनतेत असंतोष आहे. सर्व गोष्टींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनतेवरील अन्यायाचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
पोलिसांनी मोर्चा कोर्टनाका येथे अडविला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोर्टनाका येथे मोर्चा थांबविला, असे म्हस्के यांनी सांगितले.
शिवसेनेने बदलापुरात चालवली बैलगाडी
बदलापूर : बैलगाडी व सायकल चालवून शिवसेनेने पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी परिसरात हे आंदोलन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून बेलवली रोडपर्यंत सायकल व बैलगाडी चालवण्यात आली. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य हैराण झाला आहे. गटनेते श्रीधर पाटील, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी, माजी नगरसेवक तुषार बेंबळकर, संजय गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
महावितरण कार्यालयावर भाजपचा जोरदार हल्लाबोल
ठाणे : वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून अन्याय करणाऱ्या महावितरण कंपनीविरोधात भाजपने शुक्रवारी जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखून ताब्यात घेतले.
कोरोनाच्या काळात नागरिकांना वाढीव व अवाजवी बिले पाठविली होती. एकीकडे उत्पन्न बंद झाले असताना महावितरणने वीज दरवाढ लादली होती. त्याविरोधात भाजपने तीव्र आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने दिलासा देण्याचे सूतोवाच केले. मात्र, आता दिलासा देण्याऐवजी अन्यायकारक पद्धतीने महावितरणने राज्यातील ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यातून तब्बल चार कोटींहून अधिक जनता अंधारात जाणार आहे. या प्रकारामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे महापालिका हद्दीतील हजारो रहिवाशांना नोटिसा पाठविल्या. या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’च्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यात भाजप कार्यकर्त्यांबरोबर वीज ग्राहकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंब्र्यात राज्य सरकारविरोधात घोषणा
मुंब्रा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ जवळील रस्त्याजवळ असलेल्या खाजगी वीज वितरण कंपनी टोरंटच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी गेलेल्या भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद, तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्य सरकार, तसेच टोरंट कंपनीविरोधात घोषणा दिल्या. यावेळी कार्यालयाला टाळे लावण्याचा करण्यात आलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
कल्याणमध्ये चुलीवर भाजल्या भाकऱ्या
कल्याण : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला आघाडीने चुलीवर भाकऱ्या भाजून केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या इंधन दरवाढीचा जाहीर निषेध केला.
शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेनेचे रवींद्र कपोते, अलताफ शेख, रवी पाटील, अरविंद मोरे, रमेश जाधव, मनोज चौधरी, जयवंत भोईर, सुनील वायले, महिला आघाडीच्या विजया पोटे, छाया मोरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आ. भोईर म्हणाले की, ‘ इंधनाचे दर वाढत आहेत. भाजप सरकारने अच्छे दिन आयेंगे, असे आश्वासन जनतेला दिले होते. भाजप सरकारची केंद्रातील सत्तेतील दुसरी टर्म आहे. तरीही, दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत. जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. कोरोनाकाळात सामान्य माणूस मेटाकुटीला आला. तो आता कुठे त्यातून सावरत असताना त्याला इंधन दरवाढीचे झटके देणे केंद्र सरकारने सुरूच ठेवले आहे. ते कुठे तरी थांबले पाहिजे.’
पेट्रोल दरवाढीचा केला निषेध
भिवंडी : पेट्रोल दरवाढीच्याविरोधात भिवंडीत शुक्रवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत केंद्राचा निषेध केला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार अधिक पाटील यांना निवेदन दिले. या वेळी पं. स. उपसभापती सबिया भुरे, विष्णू चंदे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक , दर्शना ठाकरे, दीपक पाटील, जय भगत, प्रेमनाथ म्हात्रे, राजेंद्र काबाडी आदी उपस्थित होते.
कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न
कल्याण : वाढीव वीजबिले कमी करण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपने कल्याण पूर्वेत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी लोकग्राम येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
आ. गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संजय मोरे, सुभाष म्हस्के, नरेंद्र सूर्यवंशी, संदीप तांबे आदी सहभागी झाले होते. गायकवाड म्हणाले की, शिवसेनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले गेले. शिवसेनेचे हे आंदोलन राज्यव्यापी होते. प्रत्यक्षात हे आंदालनच बेगडी होती. अन्य राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. मात्र, महाराष्ट्रात ते जास्त असून, कमी करणारेही त्यांच्या हातात आहे. वीजबिल कमी करून जनतेला दिलासा देणे त्याचा निर्णय घेतला जात नाही.