शिवसेना आणि काँग्रेस एकत्र?
By admin | Published: June 30, 2017 02:51 AM2017-06-30T02:51:02+5:302017-06-30T02:51:02+5:30
मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी भिवंडी, मालेगावप्रमाणे शिवसेना, काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी भिवंडी, मालेगावप्रमाणे शिवसेना, काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतून इनकमिंग वाढते आहे, तर शिवसेनेने आधीच आपली बाजू भक्कम केली आहे. त्यातही भाजपातील इच्छुकांच्या प्रचंड संख्येतून बंडखोरी झाल्यास ती सामावून घेण्याची तयारीही या पक्षांत आहे. त्याची चुणूक या पक्षांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाला दाखवून दिली.
स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत परिवहन सेवेच्या प्रस्तावावर शिवसेना, काँग्रेस एकत्र आली आणि भाजपाची कोंडी करत त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
पालिकेने स्थानिक परिवहन सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) संकल्पनेवर सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. त्याला भाजपाने विरोध केला. मात्र शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत त्याला मान्यता दिली. पालिकेने जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत दुसऱ्या टप्प्यात १०० बस खरेदी करून २५ सप्टेंबर २०१५ मध्ये नव्याने सेवा सुरू केली. ही सेवा केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या सल्ल्यानुुसार जीसीसी तत्वावर सुरू करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली. त्याच्या निविदा अनेकदा प्रसिद्ध करुनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा कंत्राटावर सुरू झाली. त्यात १०० पैकी ४८ बस समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५२ बस जीसीसी सेवा सुरू होताच दाखल केल्या जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. या बस सध्या कंपन्यांमध्ये धूळखात असून त्यांची मुदतही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
जीसीसी संकल्पनेवर सेवा सुरू करण्यासाठी दिल्ली येथील श्यामा श्याम सवर््िहस सेंटर या एकमेव कंपनीने निविदा भरल्याने त्याचा विचार जीसीसीसाठी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार कंपनीने पालिकेला दरपत्रक दिले. त्याला स्थायीची मान्यता मिळावी, यासाठी पालिकेने तो प्रस्ताव गुरूवारच्या बैठकीत ठेवला. त्यावर हा प्रस्ताव सविस्तर मांडला नसून तो पुन्हा करावा, असा ठराव करुन त्याला भाजपाने विरोध दर्शविला. सेनेने मात्र शहरातील प्रवाशांची निकड लक्षात घेत कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करुन प्रस्तावाच्या बाजूची भूमिका घेतली. दोन्ही ठरावावर मतदानाची मागणी झाली. मतदानावेळी काँग्रेस सेनेसोबत गेली.