‘शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:55 AM2017-07-19T02:55:35+5:302017-07-19T02:55:35+5:30
ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच शिवसेनेने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असतांनाही आजही शहरात लोडशेंडींगचा प्रश्न कायम आहे, शहरासह कळवा, मुंब्रा या भागात पाच ते सहा तास वीज गायब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेत असतांना ठाण्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. तसेच आता राज्यासाठी पुरेशी वीजही उपलब्ध आहे. परंतु,असे असतांनाही ठाण्यासारख्या शहराला वीजेचा प्रश्न भेडसावत असेल तर हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयशच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. नियोजनाचा उडालेला बट्टयाबोळ, पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. शाई धरणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षे खीतपत पडला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, किंबहुना या कामाला गती का मिळाली नाही, असा सवालही त्यांनी केला. गडकरी रंगायतनावर आता म्हणे छत अंथरण्याचे काम सुरु आहे. परंतु, आधीच जर त्याचे पीओपी मजबुत केले असते तर आज हा पैसा खर्च करण्याची वेळच का आली असती असा सवालही त्यांनी केला.
स्थायी समिती नाही
घाणेकर नाट्यगृहाचे छत कोसळतेच कसे, दीड वर्ष उलटूनही ते खुले का केले नाही, मेट्रोबाबत खंबीर पावले का उचलली जात नाहीत, घनकचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही, रस्त्यांची चाळण झालेली आहे, परिवहनची सेवा सक्षम नाही, महापालिका निवडणूक पार पडूनही स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचेच पाप असल्याचे ते म्हणाले.