...अन् ठाण्यात राणेंच्या नावानं रुग्णालयाचा केस पेपर निघाला; शिवसैनिकांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:26 PM2021-08-24T12:26:37+5:302021-08-24T12:27:06+5:30
वादग्रस्त वक्तव्यानंतर युवा सेनेचे ठाण्यात हातात कोंबडया घेऊन आंदोलन
ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राबरोबर ठाण्यातही उमटले आहे. ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर युवासेनेच्या वतीने हातात कोंबड्या घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी नारायण राणे यांच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये केस पेपरदेखील काढण्यात आला असून त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च शिवसेना उचलेल असा उपरोधिक टोला शिवसेनेने लगावला आहे. दरम्यान राणे यांच्या विरोधात महापौर आणि आहि शिवसैनिक गुन्हे दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात जमा झाले आहेत.
राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते ते बघू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे. त्यामुळे राज्यभरात वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी राणेंविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनं सुरू आहेत.