पालिकेतील शिवसेना-भाजपाची युती अभेद्यच

By Admin | Published: February 28, 2017 03:27 AM2017-02-28T03:27:33+5:302017-02-28T03:32:16+5:30

शिवसेना-भाजपाची कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहील आणि पुन्हा परिवहनच्या निवडणुकीत ते दिसून येईल

Shiv Sena-BJP alliance in the Municipal Corporation | पालिकेतील शिवसेना-भाजपाची युती अभेद्यच

पालिकेतील शिवसेना-भाजपाची युती अभेद्यच

googlenewsNext


कल्याण : आधी भांडून, वेगळे लढून नंतर एकत्र सत्तेसाठी आलेल्या शिवसेना-भाजपाची कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहील आणि पुन्हा परिवहनच्या निवडणुकीत ते दिसून येईल, हे ‘लोकमत’चे वृत्त संतोतंत खरे ठरले आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला असून यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर देवळेकर यांनीही श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य असेल, असे सांगितल्याने केडीएमसीतील युती अभेद्यच राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या प्रचारात शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले. परस्परांवर टीकेची झोड उठविताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडणुका युती करून लढविणे गैरसोयीचे होते. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी दोन्ही पक्षांनी खेळली. आता निवडणुका पार पडल्याने या दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका ठरलेल्या जागावाटपानुसार एकत्र लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांवर डोळा ठेवून असलेल्या मनसेला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. परिवहनची निवडणूक उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता होणार आहे. त्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीन; तर मनसेचा एक सदस्य आहे. संख्याबळ पाहता भाजपाला तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
दरम्यान, उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री चव्हाण यांनी भाजपाच्या गटनेता कार्यालयात नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. अन्य महापालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर ते प्रथमच केडीएमसीत आले होते. (प्रतिनिधी)
>‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चा
शिवसेना आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर परिवहनच्या निवडणुकीत युती राहणार का? अशा तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘युती राहणार कायम’ असे वृत्त प्रसिद्ध करत त्यामागचे राजकारण उलगडून सांगितले. या वृत्ताची चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, राज्यमंत्र्यांपाठोपाठ महापौरांनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने मनसेच्या गोटात नाराजी पसरली आहे. पालिकेतील राजकारणात भाजपाविरूद्ध आपला वापर झाल्याची त्यांची भावना झाली.

Web Title: Shiv Sena-BJP alliance in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.