शिवसेना-भाजपा आमनेसामने

By admin | Published: May 23, 2017 01:35 AM2017-05-23T01:35:55+5:302017-05-23T01:35:55+5:30

मीरा- भार्इंदर महापालिकेतील मान्यताप्राप्त रयतराज कामगार संघटनेच्या सर्वच्या सर्व ३२ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून जूनच्या पहिल्या

Shiv Sena-BJP in-charge | शिवसेना-भाजपा आमनेसामने

शिवसेना-भाजपा आमनेसामने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेतील मान्यताप्राप्त रयतराज कामगार संघटनेच्या सर्वच्या सर्व ३२ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचारी रयतराजला रामराम ठोकून शिवसेना प्रणित मीरा- भार्इंदर कामगार सेनेत सामील होणार आहेत. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या श्रमिक जनरल कामगार युनियनची वाढती दडपशाही, पालिका प्रशासनाकडून मिळत नसलेला न्याय त्यातच रयतराजच्या प्रमुखांकडून होणाऱ्या दुर्लक्षतेमुळे मेताकुटीला आलेल्या या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा मार्ग पत्करला आहे.
मीरा- भार्इंदर महापालिकेत सध्या दीड हजाराच्यावर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. नगरपालिका असताना १९८८ मध्ये कर्मचाऱ्यांनी शरद राव यांच्या म्युनिसिपल लेबर युनियनची कास धरली होती. परंतु कालांतराने नेतृत्वाकडून मीरा- भार्इंदर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबत दुर्लक्ष होऊ लागल्याने डिसेंबर २०१४ मध्ये सुमारे १३०० कर्मचाऱ्यांनी रयतराजचा झेंडा हाती घेतला होता.
अडीच वर्षात कर्मचाऱ्यांना रयतराजच्या नेतृत्वाकडून ठोस पाठिंबा मिळाला नाही. त्यातच पालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार व नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी स्वत:ची श्रमिक जनरल कामगार युनियन स्थापन केली. प्रशासन व पालिकेवर पकड निर्माण केलेल्या मेहतांनी त्यांच्या अध्यक्षते खालील पालिका युनियनमध्ये सदस्य वाढवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र सुरू केले. त्यांच्याकडे येणारे अधिकारी वा कर्मचाऱ्यांना महत्वाच्या पदांवर बसवणे, निलंबितांना पुन्हा सेवेत घेणे, विरोधकांना अडचणीत आणणे वा आडजागी बदली करणे असले प्रकार सदस्य करण्यासाठी सुरू झाले.
पालिका कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीवेळीही मेहता प्रणित भाजपाच्या संघटनेकडून दबावतंत्र सुरू झाल्याने मनसे वगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बविआ यांनी एकत्र येऊन मेहतांच्या पॅनलचा पराभव केला. पतपेढीच्या निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच झोंबल्या नंतर मेहतांनी पालिका कर्मचाऱ्यांची आणखी एक पतपेढी सुरू करण्याच्या हालचाली सुरु केल्या. विशेष म्हणजे एक पतपेढी असताना प्रशासनानेही झुकते माप दिले.
या सर्व तणावाला कंटाळलेल्या रयतराजच्या पदाधिकारी व कर्मचारी सदस्यांनी अखेर शिवसेना प्रणित कामगार सेनेचा पर्याय निवडला. रयतराजच्या पालिका युनिटमधील सर्वच्या सर्व ३२ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम व सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवसेनेच्या कामगार सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कदम व पटेल सोबत खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांची नुकतीच भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. पालिकेतील भाजपा प्रणित कामगार संघटनेची दहशत, दडपशाही व त्यांच्या दबावामुळे बड्या अधिकाऱ्यांकडून मिळत नसलेला न्याय याचा पाढाच कर्मचाऱ्यांनी वाचला.
विचारे व सरनाईक यांनी कुणाचीही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असे आश्वासन देत शिवसेनेच्या झेंड्याखाली कर्मचाऱ्यांना निर्धास्त राहण्याचे व त्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवणार असे आश्वासन दिले.
दरम्यान, पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शिवसेना-भाजपामध्ये ठिणगी पडायला सुरूवात झाली आहे. त्यातूनच राजकारण सुरू झाले आहे.

Web Title: Shiv Sena-BJP in-charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.