स्थायी सभापतीपद निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:48+5:302021-05-11T04:42:48+5:30
उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीला शासनाने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे. महापालिकेत शासनाचा नव्हे तर शिंदेशाहीचा ...
उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीला शासनाने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे. महापालिकेत शासनाचा नव्हे तर शिंदेशाहीचा कारभार चालत असल्याचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. तसेच शहर १० वर्षे मागे गेल्याचे म्हटले आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने ओमी टीम समर्थक नगरसेवकांना फाेडून महापाैरपद मिळवले. तर स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व भाजपचे बंडखोर स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक व अनुमोदक दिले. तसेच दुसरे भाजपचे समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना समिती सदस्याचा राजीनामा देण्यास भाग पाडून पाटील यांना सभापतीपदी निवडून आणले. या वर्षीही स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. मात्र, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोरोनाचे कारण देऊन निवडणूक पुढे ढकलली आहे.
महापालिकेत बहुमत असताना शिवसेनेने भाजपला शह देऊन सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेना आघाडीतील रिपाइं पक्षाचे गटनेता व उपमहापौर भाजप गोटात गेल्याने भाजपने शिवसेनेविरोधात आघाडी उभी केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव, नगरसेवक राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी आदींनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खापर फोडले. महापालिकेवर शासनाचा नव्हे तर शिंदेशाहीचा राज चालत असल्याचा आरोप आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे.
चौकट
भाजपचे कोरोना काळात राजकारण - चौधरी
शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे रात्रंदिवस आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. तर भाजपचे पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करण्यात पुढे आहेत. नागरिकांच्या जिवापेक्षा त्यांना राजकारण करायचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.