शिवसेना-भाजपात जोरदार राडा , पालिकेत आमनेसामने : बेकायदा बांधकामप्रकरणी अधिका-यांना अभय दिल्याचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:48 AM2017-10-14T02:48:45+5:302017-10-14T02:49:08+5:30
बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात
कल्याण : बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात अक्षरश: रणकंदन झाले. दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात सभागृहात व बाहेरही घोषणा देत परस्परांविरोधातील संताप व्यक्त केला.
‘फ’ प्रभागातील बेकायदा बांधकामाचा विषय गेल्या आठवड्यात गाजला होता. प्रभाग समितीच्या सभापती असलेल्या भाजपाच्या खुशबू चौधरी यांनी प्रभाग अधिकारी अमित पंडित व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या निलंबनाची सभागृहात केली. ती करणार नसाल, तर महासभा तहकूब करा, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाद दिली नाही. त्यामुळे भाजपा सदस्यांनी महासभेचे कामकाज रोखून धरण्यासाठी सभागृहात जय श्रीराम, मोदींचा जयजयकार अशा घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी ‘मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नहीं बतायेंगे’ या घोषणांनी प्रत्युत्तर दिले. कामकाज दोनदा काही काळासाठी तहकूब झाले, पण ते पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याची मागणी धुडकावून महापौरांनी पटलावरील सर्व विषय मंजूर केले. सभागृहाबाहेर पडून भाजपा सदस्यांनी महापौरांविरोधात घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी महापौरांच्या विजयाच्या घोषणांनी उत्तर दिले.
काय आहे मूळचे प्रकरण?
प्रभाग समितीला कोणतेही अधिकार नाहीत. समितीच्या सभेला अधिकारी गैरहजर राहतात. बेकायदा बांधकाम प्रकरणी कारवाई करीत नाहीत, असे मुद्दे मांडत पंडित व टेंगळे यांच्या निलंबनाची मागणी खुशबू चौधरी करत होत्या. त्यासाठी त्यांनी सभा तहकूबीची सूचना मांडली होती. त्यावर देवळेकर यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना निवेदन करण्यास सांगितले. त्यांनी बेकायदा बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित अधिकाºयांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. या निवेदनानंतर चौधरी यांनी सभा तहकूबी मागे घ्यावी, अशी विनंती महापौरांनी केली. मात्र तहकूबी किंवा निलंबनावर भाजपा सदस्या प्रमिला चौधरी, राजन सामंत, गटनेते वरुण पाटील आग्रही होते. त्याला विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही दुजोरा दिला. मात्र महापौरांनी पाच मिनिटे सभा तहकूब केली. त्यानंतर महापौर सभेला सामोरे गेले नाहीत. त्यांच्या जागी सभागृह नेते राजेश मोरे यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. मात्र, भाजपा सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे मोरे यांनी दहा मिनिटे सभा तहकूब केली. या गोंधळानंतर महापौर सभागृहात आले. तेव्हा भाजपा सदस्यांनी घोषणाबाजी केली. दोनदा सभा तहकूब केल्याने सभा तहकूबी संपुष्टात आल्याचे म्हणणे त्यांनी मांडले, पण भाजपा सदस्य ठाम राहिल्याने गोंधळातच महापौरांनी काम सुरू करत सर्व विषय पुकारले. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनी मंजूर मंजूर असा प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार-
भाजपा गटनेते पाटील व सदस्य राहूल दामले यांनी विषय चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्याचा दावा केला. अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणाºयांवर कारवाई न करता महापौरांनी त्यांना पाठिशी घातल्याचा आरोप या नेत्यांनी केला. शिवसेना सदस्यांची उपस्थिती कमी असल्यानेमागणी करूनही महापौरांनी या प्रस्तावावर मतदान घेतले नाही. महापौरांच्या मनमानीविरोधात नगरविकास खात्याकडे व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महत्त्वाच्या विषयावर चर्चा न करता महापौरांनी लगेच राष्ट्रगीत घेतल्याने त्याचाही अवमान झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला.