शिवसेना-भाजपाची चक्क युती, फेरीवाल्यांविरोधात एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:51 AM2017-11-06T03:51:40+5:302017-11-06T03:51:55+5:30

मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये सोमवारचा बेकायदा बाजार तसेच फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊनही पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने त्याच्या निषेधार्थ

Shiv Sena-BJP combine, together against hawkers | शिवसेना-भाजपाची चक्क युती, फेरीवाल्यांविरोधात एकत्र

शिवसेना-भाजपाची चक्क युती, फेरीवाल्यांविरोधात एकत्र

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये सोमवारचा बेकायदा बाजार तसेच फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊनही पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने त्याच्या निषेधार्थ उद्यापासून शिवसेनेने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. स्थानिक सेना नगरसेविका दीप्ती भट यांनी आयुक्तांना पत्रच दिले असून विशेष म्हणजे फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांनीही पालिकेला पत्रं दिली आहे. जलवाहिनीची कामे तसेच उद्यानाच्या उद्घाटनावरून प्रभागातील सेना व भाजपा नगरसेवक आमनेसामने असले, तरी फेरीवाल्यांना हटवण्याच्या मुद्यावरून मात्र सर्व एकत्र आले आहे.
शांतीनगरमध्ये ठिकठिकाणी फेरीवाले व हातगाड्यांनी बस्तान बसवले आहे. आधीच अंतर्गत रस्ते अरुंद असताना त्यात दुकानदारांनी वाढवलेले छत व पुढे रस्ता-पदपथांवर अतिक्रमण करून बसणाºया फेरीवाल्यांमुळे येथे सातत्याने रहदारीला अडथळा होतो. सर्वसामान्य नागरिकांना तर चालणे दुरापास्त झाले आहे. वाहनचालक तर नाइलाजास्तव येथून जाणेच टाळतात. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे येथे महिला, तरुणींची छेड काढणे, चोºया, भांडणे सातत्याने होतात.
स्थानिक रहिवाशांसह दुकानदार तसेच प्रभागातील विद्यमान व आधीच्या नगरसेवकांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी सातत्याने केली होती. या ठिकाणी काँग्रेससह अन्य एका संस्थेने आंदोलनही केले. पण, महापालिका प्रशासनाने मात्र थातूरमातूर वा केवळ दिखाव्यापुरतीच कारवाई केली. माजी नगरसेवक प्रशांत दळवी यांनी, तर अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी केल्या. महासभेत आवाजही उठवला. राजीनामा देण्याचा इशारा दिला. पण, महासभेत तत्कालीन आयुक्तांनी तर फेरीवाल्यांकडून कोण हप्ते घेतात, हे आम्हाला माहीत आहे, बोलायला लावू नका, असे खडे बोल सुनावत खळबळ उडवून दिली होती.
या ठिकाणी फेरीवाल्यांसह सोमवारचा बेकायदा बाजार भरवला जात असल्याच्या विरोधात नगरसेविका भट यांनीही सतत पत्रव्यवहार केले. गेल्या वर्षी त्यांनी उपोषणाचा इशारा दिला असता पालिकेने त्यांना सोमवार बाजार बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण, आजतागायत ठोस कारवाईच केली नाही. या ठिकाणी फेरीवाल्यांच्या माध्यमातून मोठी अर्थपूर्ण उलाढाल होत असल्याने काही नगरसेवकांसह पालिका अधिकारी, कंत्राटदार व बडे राजकारणी यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे फेरीवाले व सोमवार बाजारवर कठोर कारवाई केली जात नाही, असा आरोप जागरूक नागरिकांसह काही संस्थांच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
सोमवार बाजार व फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने आता भट यांनी सोमवारपासून गणेश चौकात उपोषणास बसण्याचे पत्र आयुक्तांना दिले आहे. तर, प्रभागातील अन्य स्थानिक भाजपा नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरिया व हेतल परमार यांनीदेखील पालिकेला फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून रस्ते, पदपथ मोकळे करण्याची मागणी केली आहे.
उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन परमार यांनी येथील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले तसेच शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळे तसेच पदपथ-रस्त्यांवरील सरसकट सर्व फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईची पुन्हा लेखी मागणी केली आहे.

रविवार बाजारामुळे वाहतूककोंडी
भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणाºया रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करुन दोन वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रस्त्याचे काम सुरु असल्याने दोन्ही रस्त्यांवरचा प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशाला देखील पालिकेने हरताळ फासला आहे.
४ डिसेंबर २०१५ च्या महासभेत तत्कालीन सत्ताधारी भाजपा व सोबत असलेल्या शिवसेना, बविआने या बाजारात केवळ स्थानिक मासळी विक्रेते, भाजीपाला व घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यानांच बसू देण्याचा ठराव केला होता. सुरूवातीला महिना - दोन महिने कारवाई झाली. त्यातही क्रॉस गार्डनपर्यंत व नंतर पुढे थेट शिवसेना गल्लीपर्यंत सर्रास फेरीवाले बसू लागले.
भार्इंदर रेल्वे स्थानकापासून थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतच्या प्रवाशांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सतत वाहनांची वर्दळ असते. आधीच या मार्गावर बेकायदा वाहने उभी केली जातात. त्यात फेरीवाल्यांची भर पडल्याने कोंडीने जीव मेटाकुटीला येतो. उच्च न्यायालयाने नुकताच स्पष्ट आदेश देऊनही महापालिका व सत्ताधारी यांना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. मूळात या भागातून बक्कळ बाजार वसुली केली जाते.

फेरीवाल्यांसह दुकानदारांनीही सार्वजनिक जागा व्यापली असून सर्वांवर कडक कारवाई सातत्याने झाली पाहिजे.
- दिनेश जैन, नगरसेवक
उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशांचे पालिकेने काटेकोर व सातत्याने पालन करून शांतीनगरच्या रहिवाशांना दिलासा द्यावा, याबद्दल पत्र दिले आहे.
- हेतल परमार, नगरसेविका
पालिका लेखी पत्र देऊनही कारवाई करत नसल्याने यात मोठे आर्थिक लागेबांधे असावेत. सोमवार बाजार व फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रासले असून कारवाई झाली नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल.
- दीप्ती भट, नगरसेविका
सध्या लॉज, बारवर कारवाई सुरू असल्याने सर्व कर्मचारी तिकडेच व्यस्त आहेत. कर्मचारी मिळताच कारवाई केली जाईल.
- जगदीश भोपतराव, प्रभाग अधिकारी

Web Title: Shiv Sena-BJP combine, together against hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.