शिवसेना-भाजपा आमने-सामने; दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:14 AM2018-10-30T00:14:18+5:302018-10-30T00:14:43+5:30
रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे.
डोंबिवली : रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे. फेरीवाल्यांना हटवून शिवसेनेने दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप भाजपाचे कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी करत फेरीवाल्यांसह सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास केडीएमसीने न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई केली आहे. त्यामुळे बाहेरील हद्दीत व्यवसाय करण्यावरून सध्या फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केडीएमसीच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असताना हद्दीच्या बाहेर फेरीवाल्यांना हुसकावून शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांनी दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप जाधव यांचा आहे. या दिवाळीच्या स्टॉलमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघर्ष घडवून आणणाºयांचा बंदोबस्त करा, अशी मागणी जाधव यांची आहे. स्वामिनारायण मंदिर ते रामनगर पोलीस ठाणे, असा मोर्चा काढण्यात आला. फेरीवाले व भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
‘त्यांना’ हुसकावलेले नाही - वैशाली दरेकर-राणे
दिवाळीचे केवळ १० दिवस महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. तेथील फेरीवाल्यांना थोडेसे मागे सरकायला सांगितले आहे. त्यांच्या व्यवसायाला बाधा आणलेली नाही.
त्यामुळे आम्ही अन्याय करतोय आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. सात ते आठ वर्षांपासून शिवसेनेकडून येथे स्टॉल लावले जात आहेत.
आधी कोणाला अडचण नव्हती, पण आताच का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भाजपाची भूमिका काय?
आॅगस्टमध्ये हद्दीच्या बाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हुसकावून लावले होते. यावेळी त्यांनी घेतलेला आक्रमक
पवित्रा चर्चेचा विषय ठरला होता. यात काही दिवस फेरीवाला संघटनेच्या नेत्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. शहराच्या बाहेरून येऊन फेरीवाले दादागिरी करत असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
सोमवारी भाजपाचेच पदाधिकारी असलेले जाधव हे मात्र हद्दीच्या बाहेर बसणाºया फेरीवाल्यांच्या बाजूने होते. त्यांनी काढलेल्या मोर्चात चव्हाण यांनी हुसकावून लावलेले फेरीवालेही सहभागी झाले होते तसेच काही फेरीवाले अतिक्रमणाविरोधात उपोषण छेडणारेही भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.