पत्रीपुलाच्या डेडलाइनवरून शिवसेना-भाजप आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:28 AM2020-03-09T00:28:00+5:302020-03-09T00:28:34+5:30
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण होणार आहे. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. जुन्या पत्रीपुलाचे काम नव्याने करण्यात येत आहे.
मुरलीधर भवार, कल्याण
कल्याण-शीळ मार्गावरील कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपूल या रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्च २०२० अखेर पूर्ण होणार, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळासह राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केला जात असला, तरी पत्रीपुलाची डेडलाइन पाळली जाणार नाही. पत्रीपुलाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप करीत भाजपने अलीकडेच पत्रीपुलानजीक धरणे आंदोलन केले. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपने पत्रीपूल हा राजकीय मुद्दा म्हणून तापवून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यामुळे पुलाच्या कामाची डेडलाइन पाळण्याचे दडपण शिवसेनेवर आहे. दिलेली डेडलाइन पाळणार, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाडण्यात आला. पूल पाडण्यापूर्वी तो २१ आॅगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुलाच्या पाडकामावरून बरेच राजकारण तापले होते. रेल्वे, राज्य रस्ते विकास महामंडळासह त्यावेळी सत्ताधारी शिवसेना-भाजपला लक्ष्य केले गेले होते. महापालिकेच्या व राज्याच्या सत्तेत त्यावेळी शिवसेना, भाजपची युती होती. त्यामुळे मनसेकडून या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका करीत आंदोलन केले गेले. पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण केले जाईल, अशा आश्वासनाचा फलक २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आ. विश्वानाथ भोईर यांनी लावला होता. त्यांच्या या बॅनरचा आधार घेत शिवसेनेकडून पत्रीपुलाच्या कामाविषयी फसवी डेडलाइन दिली गेली, असा मुद्दा उपस्थित केला गेला. भोईर यांनी लावलेला बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याचबरोबर भोईर यांच्याकडून पराभूत झालेले भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांनी पत्रीपुलाच्या कामात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिरंगाई केली आहे, असा आरोप केला. पवार यांना कामाचे श्रेय निवडणुकीत मिळू नये, याकरिता पुलाच्या कामात दिरंगाई केल्याचा आरोप करीत पालकमंत्र्यांना लक्ष्य केले गेले. पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याणचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुलाच्या मंजुरीपासून ते पुलाचे काम दिलेल्या वेळेत मार्गी लागावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
पुलाचे काही गर्डर हैदराबाद येथून कल्याणमध्ये आले आहेत. पुलाचे काम आता पूर्णत्वास येत असल्याने भाजपने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पुलाच्या प्रश्नावर धरणे आंदोलन केले. शिवसेनेचे आ. भोईर यांनी माजी आमदार पवार यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने केल्याचा दावा केला आहे. पुलाची डेडलाइन ही राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांकडून देण्यात आलेली आहे. तसेच पुलाच्या कामाकरिता पालकमंत्री व खासदारांनी कंबर कसली असताना अशा प्रकारचे धरणे आंदोलन करून श्रेय घेण्यासाठी चढाओढ करणे कितपत योग्य आहे, असे प्रत्युत्तर शिंदे पितापुत्रांनी दिले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पत्रीपुलाच्या कामाचा विषय हा कळीचा मुद्दा ठरला होता. महापालिकेच्या आगामी निवडणुका पाहता पत्रीपुलाचा मुद्दा पुन्हा तापणार आहे. मागीलवेळी मनसेने हा मुद्दा तापवला, यावेळी त्याला भाजपकडून हवा दिली जात आहे. भोईर यांच्या प्रचारफलकात दिलेली फेब्रुवारी २०२० ची डेडलाइन पाहता खा. शिंदे यांनी पत्रीपूल मार्च २०२० अखेर पूर्ण होणार, असा दावा केला आहे.
भाजपच्या धरणे आंदोलनास उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुलाचे काम मार्च २०२० मध्ये पूर्ण होणार नाही. त्याला मे महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो, असे स्पष्ट केले. त्याचे कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात रेल्वेपुलाचे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घेता येणार नाही. ब्लॉक मिळाल्याशिवाय गर्डर टाकण्याचे काम होणार नाही. त्यामुळे मार्च २०२० ची डेडलाइन हुकू शकते.
शिवसेना पदाधिकाºयांच्या या वक्तव्यामुळे खासदारांचा दावा खरा की पदाधिकाºयांचा खरा, असा पेच निर्माण झाला. खासदारांनी पत्रीपुलाची दिलेली डेडलाइन पाळली गेली नाही, तर पत्रीपूल रहिवासी संघाचे पदाधिकारी शकील खान यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण होणार आहे. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. जुन्या पत्रीपुलाचे काम नव्याने करण्यात येत आहे. तो दुपदरी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दुपदरी पुलावर वाहतूक सुरू आहे. आणखी एक दुपदरी पूल बांधण्यास मंजुरी आहे. त्याचे कामही जून २०२० मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यास कल्याण-शीळ रस्ता सहापदरी होणार आहे. पुलाचे काम मार्गी लागल्यावर पुलावर वाहतूककोंडी होणार नाही. वाहनचालकांना दिलासा मिळू शकतो. मात्र, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्याचे राजकारण जास्त होऊ शकते. भाजपने शिवसेनेपासून फारकत घेतल्याने शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडण्यासाठी पत्रीपुलाचा भाजपला मोठा आधार लाभला आहे.