शिवसेना-भाजपामध्ये पळवापळवी

By admin | Published: July 6, 2017 06:07 AM2017-07-06T06:07:26+5:302017-07-06T06:07:26+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची शिवसेना व भाजपामध्ये जंबो भरती करून

Shiv Sena-BJP in Palawaklavi | शिवसेना-भाजपामध्ये पळवापळवी

शिवसेना-भाजपामध्ये पळवापळवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची शिवसेना व भाजपामध्ये जंबो भरती करून घेतल्यानंतर आता एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पळवापळवी शिवसेना - भाजपात सुरू झाली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चाललेल्या या चढाओढीमुळे युतीमध्ये तणातणी वाढू लागली आहे.
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी युती करून भाजपा व शिवसेनेने भरघोस जागा मिळवल्या. त्यावेळी आमदार नसतानाही नरेंद्र मेहतांनी आमदार प्रताप सरनाईक यांना जेरीस आणले होते. भार्इंदर पूर्व, मीरा रोड व काशिमीरा भागातील तीन महत्वाच्या प्रभागात युती न करता मेहतांनी स्वत:चे नगरसेवक निवडून आणत सरनाईकांना चांगलाच धक्का दिला होता.
त्यानंतरही मेहतांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन म्हात्रेंसह सुनील पेडणेकर आदी शिवसैनिकांना भाजपात खेचून आणले होते. महापालिका वा शहरातील राजकारणात ज्येष्ठ आमदार असूनही सरनाईकांना नेहमीच मेहतांनी शह दिला. पण मेहतांचे उपद्रव मूल्य पाहता सरनाईकांबद्दल अगदी खुद्द भाजपातली मंडळीही खाजगीत चांगलेच मत व्यक्त करतात. परंतु विविध वर्गातील नागरिकांचे अनुभव पाहता आताच्या पालिका निवडणुकीतील वारे भाजपाविरुध्द नसून मेहतांविरुध्द असल्याचे चित्र आहे. त्यातच सरनाईकांसोबत आता माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा व माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम एकत्र आल्याने मेहतांविरुध्द दबलेल्या आवाजाला बळ मिळू लागले आहे.
उमेदवारी देण्याचे आश्वासन पाळण्याची मावळलेली शक्यता व विद्यमान काही नगरसेवकांचा पत्ता कापण्याची स्थिती पाहता भाजपात बंडाळीचे वारे वाहू लागले आहेत. या मेहता विरोधकांना शिवसेना व सरनाईकांसह आता मेंडोन्सा यांचा आधार वाटत असल्याने भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेची वाट धरली आहे.
शहरातील जैन, गुजराती मतांवर भाजपाचा प्रभाव पाहता सरनाईकांनी भाजपातील उत्तर भारतीयांना मोठ्या प्रमाणात सेनेत आणले आहे. भाजपातून माजी नगरसेविका स्नेहा पांडे यांच्यासह ब्रिजेश सिंह, शैलेश पांडे, ब्रिसेनसिंह, रामानंद पांडेय, डॉ. पारस गुप्ता, नागेश्वर शुक्ला, सुरेश दुबे, करण पांडेय आदी तब्बल २५ मोठे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सेनेत आले आहेत. उत्तर भारतीयांची मते देखील लक्षणीय असल्याने सेनेला त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे.
सेनेकडे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय पदाधिकारी, कार्यकर्ते जात असल्याने मेहतांनीदेखील सेनेतील असंतुष्टांना चाचपडण्यास सुरूवात केली आहे. सेनेच्या गीता वासुदेव, मनोज मयेकर, संजय साळवी आदींना भाजपात घेतले. सरनाईकांनी भाजपाला गळती लावली असतानाच भाजपा नगरसेविका दिप्ती भट यांना सेनेत आणून मेहतांना चांगलाच धक्का दिला. तर मेहतांनीही सेना नगरसेवक प्रशांत दळवी यांना भाजपात प्रवेश देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
दोन्ही काँग्रेसमधून आता हाती लागेल व फुटेल असे कोणी दिसत नसल्याने भाजपा व शिवसेनेत एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. सरनाईकांना उत्तर देण्यासाठी मेहतांनी कंबर कसली असून शिवसेनेतील असंतुष्ट वा नाराजांना गोंजारण्यास सुरूवात केली आहे.
भार्इंदर पूर्वेस सेनेचे नगरसेवक असलेल्या प्रभागातील विभागप्रमुख दीपक सावंत, शाखाप्रमुख सुनील मुद्रस, उपशाखाप्रमुख गजानन खडसे, मंगेश गायकर सह काही शिवसैनिकांना भाजपात ओढून सेनेच्या अडचणी वाढवल्या आहेत; तर मेहतांनी सेनेचे पदाधिकारी घेताच सरनाईकांनी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र शुक्ला, मंडळ उपाध्यक्ष रमेश कश्यप, विद्यार्थी सेल जिल्हा उपाध्यक्ष अंशु तिवारी व महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला नाग यांना सेनेत आणून उट्टे काढले.

Web Title: Shiv Sena-BJP in Palawaklavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.