कारिवली गावांत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:04 PM2017-12-12T19:04:13+5:302017-12-12T19:04:23+5:30
भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापत असताना कारिवली गावांत झालेल्या हाणामारीने पोलिसांची जबाबदारी वाढविली आहे. तालुक्यातील कारिवली गावांत वैभव पाटील व त्याचे भाऊ गावातील काही लोकांबरोबर राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसले असताना तेथे शिवसेनेचे उमेदवार गोकूळ नाईक हे आपल्या साथीदारांसोबत आले आणि कंपाऊंडमध्ये बसलेल्यांच्या अंगावर दगडविटांचा मारा करीत ‘तुमच्यात किती दम आहे,’ असे म्हणत मारहाण केली.
या मारहाणीत वैभव पाटीलसह त्यांचा भाऊ जतीन पाटील, मित्र स्वप्नील पंडित नाईक, राहुल पाटील असे पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैभव पाटील याने भोईवाडा पोलीस ठाण्यात शिवसेना उमेदवार गोकूळ नाईकसह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मोहीत शिवाजी पाटील याने छत्रपती पाटील यांच्या घरासमोर निवडणुकीचा राग धरून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे कारिवली गावांतील वातावरण तंग झाले असून भोईवाडा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही.