शिवसेना नगरसेवकाच्या कंपनीला घातला ३५ लाख रुपयांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:39 PM2019-09-26T23:39:53+5:302019-09-26T23:40:04+5:30
डोंबिवलीतील भामट्यास अटक; पोलीस कोठडीत रवानगी
ठाणे : नामांकित कंपनीत बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ३४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या अवधेश सिंग ऊर्फ राहुल (रा. डोंबिवली) या भामट्याला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या सावरकरनगर येथील रहिवासी रमेश चव्हाण यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांचे मित्र सदाशिव गोडसे यांची शिवसागर ही कन्स्ट्रक्शन्स कंपनी आहे. यामध्ये चव्हाण, सदाशिव गोडसे, ठाणे महापालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के व गणेश पाटील हे भागीदार आहेत. या कंपनीने अनेक मोठे प्रकल्पही राबवले आहेत. डोंबिवलीतील दावडी येथील अवधेश याने शिवसागर कंपनीला एल अॅण्ट टी या कंपनीचे वडाळा येथे सिव्हील कामाचे कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्याचा व्हेंडर कोड मिळविण्यासाठी तीन लाख ६० हजारांची रक्कम रोख आणि धनादेश स्वरूपात त्याने सप्टेंबर २०१७ ते २८ जून २०१८ या काळात घेतली. हे काम चालू झाल्यानंतर कामगारांचे पगार करण्यासाठी वेळोवेळी इंड्स एण्ड बँकेच्या पवई शाखेच्या खात्यात चव्हाण यांच्या कंपनीकडून २६ लाख ७० हजारांची रक्कम आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात घेतली. तसेच त्याचे भागीदार विनयकुमार शुक्ला व संदीप सिंग यांनीही हे काम करीत असल्याचे सांगून साडेचार लाखांची रक्कम घेतली. अशा प्रकारे अवधेश व त्याचे भागीदार विनयकुमार आणि सिंग यांनी आपसात संगनमत करून चव्हाण तसेच नगरसेवक बारटक्के यांच्याकडून एल अॅण्ड टी कंपनीत मिळवलेल्या कामाचे व्हेंडर कोड आणि कामाची वर्क आॅर्डर देतो, असे सांगून ३४ लाख ८० हजारांची रक्कम घेतली. अर्थात, हे व्हेंडर कोड आणि कामाची वर्क आॅर्डर तर मिळवून दिली नाहीच, शिवाय त्याने कामाचे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी याप्रकरणी २९ आॅगस्टला वर्तकनगर पोलीस ठाण्यात अवधेश, विनयकुमार आणि संदीप या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने अवधेश याला २५ सप्टेंबरला अटक केली. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.