शिवसेना नगरसेवकाचे उपोषण
By admin | Published: April 1, 2017 11:33 PM2017-04-01T23:33:34+5:302017-04-01T23:33:34+5:30
केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे
डोंबिवली : केडीएमसी हद्दीत बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. अनेक मालमत्तांकडून करआकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेस वर्षाला ७० कोटींचा तोटा होत आहे. या मुद्द्यांवर २०१० पासून शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे केडीएमसीकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून त्यांनी पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर ७२ तासांचे उपोषण सुरू केले आहे.
महापालिका हद्दीत २० हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्या आहेत. त्यावर, महापालिका कारवाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेला त्याचा फटका बसत आहे. बेकायदा जोडण्या शोधून त्या नियमित करण्याचा ठराव मंजूर करण्याची म्हात्रे यांची २०१० पासूनची मागणी आहे. तसेच अनेक मालमत्तांकडून करआकारणीच होत नाही. त्यामुळे महापालिकेस आर्थिक नुकसान होत आहे.
महापालिकेने बेकायदा जोडण्या व मालमत्ता शोधण्यासाठी एका एजन्सीला सर्वेक्षणाचे काम दिले आहे. मात्र, ही एजन्सी प्रभाग अधिकाऱ्यांकडूनच मालमत्तांची यादी घेऊन त्याच मालमत्तांना नोटिसा बजावत आहे. नवीन मालमत्तांचा शोध घेतलेला नाही. एजन्सीला कंत्राट देऊन वर्षे उलटली, तरी अजूनही त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे किती मालमत्ता व चोऱ्या करणाऱ्या नळजोडण्या शोधल्या, याचा आकडाच समोर आलेला नाही.
मागील सहा वर्षांत महापालिकेचे जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. चोरीच्या नळजोडण्या व मालमत्ता करआकारणीसोबत महापालिकेत ई-निविदेमध्ये भ्रष्टाचार होत आहे. तो रोखावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. यापूर्वी म्हात्रे यांनी प्रभाग कार्यालयात, केडीएमसी मुख्यालयासमोर याच मागणीसाठी उपोषण केले आहे. प्रशासन त्यांना केवळ आश्वासनेच देत आहे. ठोस कारवाई होत नसल्याने म्हात्रे यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून अनेक वेळा पक्षश्रेष्ठी व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मेसेज केले आहेत.
महापालिका प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या उपोषणाची प्रशासन काय दखल घेते, तसेच काय कारवाई करते, याकडे म्हात्रे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, म्हात्रे यांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा आजार आहे. तरीही, भर उन्हात ते जनहितासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. (प्रतिनिधी)