शिवसेनेची बॅनरबाजीतून भाजपवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:49+5:302021-08-26T04:42:49+5:30
ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंगळवारी ठाण्यात उमटल्यानंतर बुधवारी ...
ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंगळवारी ठाण्यात उमटल्यानंतर बुधवारी शिवसेनेने भाजपवर बॅनरबाजीतून टीका केली. ‘बरळत राहणे तुमचे काम आहे; जीभ ताब्यात ठेवा, शिवसैनिक ठाम आहे.. आज, उद्या कधीही उद्धव ठाकरेंसोबत...’ अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची यावर नावे आहेत.
राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. मंगळवारी ठाण्यात युवा सेनेच्या वतीने मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन करून राणे यांचा केसपेपर काढून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याची टीका केली होती. नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेकडून झालेल्या या हल्लाबोलानंतर भाजपनेदेखील ‘आमचा कार्यकर्ता हा संयमी आहे; परंतु वेळ पडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवारी ठाण्यातील वातावरण शांत होईल असे वाटत असतानाच शहरभर शिवसेनेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीतून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.