शिवसेनेचा वाद आला रस्त्यावर; स्पर्धेच्या नावावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:28 AM2020-02-29T00:28:29+5:302020-02-29T00:28:37+5:30
उपनगराध्यक्षांचे भीख मांगो आंदोलन
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. मात्र, या स्पर्धेला नगराध्यक्ष चषकाऐवजी रमेश गोसावी चषक नाव देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट निर्माण झाले होते. उपनगराध्यक्ष हे रमेश गोसावी चषक स्पर्धेसाठी आग्रही होते. मात्र, पालिकेत अशा नावाने स्पर्धा घेण्याचा विषय मंजूर नसल्याने त्या नावावर स्पर्धा घेता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका प्रशासनाला पुढे करून स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री भीख मांगो आंदोलन केले. प्रत्यक्षात, हे आंदोलन प्रशासनाला पुढे करून केले असले, तरी या आंदोलनाचा कल मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच होता.
अंबरनाथ पालिकेत सत्ताधाºयांच्या दोन गटांत चांगलीच जुंपली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन गटांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अंबरनाथ पालिकेत नगराध्यक्ष चषक शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याबाबत १० लाखांचा विषय मंजूर झाला होता. या स्पर्धा शिक्षण समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याने उपनगराध्यक्ष शेख यांनी ही स्पर्धा रमेश गोसावी चषक नावाने घेण्यासंदर्भात पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता.
मात्र, त्यावरून राजकारण चांगलेच तापले. मुळात ही स्पर्धा रमेश गोसावी चषक नावाने घेण्याबाबत कोणताही ठराव झाला नव्हता. त्यातही ही स्पर्धा त्याच नावाने घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, प्रशासनाला सत्ताधाºयांच्या दुसºया गटानेही कडाडून विरोध केला. यामुळे वातावरण तापले आहे.
शेख यांच्या वतीने स्पर्धा:प्रशासनाने रमेश गोसावी चषक नावाला विरोध केल्याने उपनगराध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पालिका कार्यालयात हे आंदोलन होणार होते. मात्र, त्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे शेख यांनी गुरुवारी रात्री पालिका प्रशासनाविरोधात भीख मांगो आंदोलन केले. दरम्यान, उद्या शेख यांनी पालिकेला बाजूला सारून ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.