शिवसेना खोटी आश्वासने देत नाही - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:42 AM2019-01-09T03:42:55+5:302019-01-09T03:43:05+5:30
सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन : कल्याणमध्येही हवाई रिक्षा सुरू करण्याची केली घोषणा
कल्याण : शिवसेना कधीही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करुन दाखवितो, असा टोला शिवसेनेचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी भाजपाला लगावला. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर कल्याणच्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी हवाई रिक्षा सुरु करण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरीपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर उपेक्षा भोईर, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना खोटी आश्वासने देत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही. जे कराल तेच सांगा असे बजावले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर ते काम कुठपर्यंत आले. त्याची पूर्तता झाली की नाही यावर आम्ही नजर ठेवून असतो. दोन निवडणुकींच्या मधल्या काळात अनेक पक्ष राजकारण करीत असतात. शिवसेना मात्र दोन निवडणुकीच्या मधल्या काळात जनतेला दिलेली वचनपूर्ती करण्यावर लक्ष देते. समाजकारणाचा वसा शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिला आहे. मी आत्ता २८ वर्षाचा असलो तरी माझ्या ५० व्या वर्षी गाव, शहरे, राज्य आणि देशातील विकासाची स्थिती काय असेल. याचा विचार करतो.
रिंगरोडचे काम लवकर व्हावे - पालकमंत्री
च्पालकमंत्री शिंदे म्हणाले की, सिटी पार्क हा उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रॉजेक्ट आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. सिटी पार्कसोबतच कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी पक्षप्रमुखांनी जातीने लक्ष दिले आहे.
च्कल्याणमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आयुक्त बोडके यांनी रस्ते रुंदीकरण हाती घ्यावे. त्यासाठी पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. कल्याणच्या वाहतूककोंडीवर रिंगरोड हा रामबाण उपाय आहे. या रिंगरोडचे काम जलद गतीने मार्गी लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपाचा निधी
कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार आहे का, अशी विचारणा काहींनी केली असली तरी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी युती कटीबद्ध आहे. या विकासात ठाकरे कुटुंबीयांचे योगदान असले तरी त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला आहे. याठिकाणी शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. तरीसुद्धा विरोधक गाजर दाखवल्याचे आंदोलन करतात, असा टोला भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी लगावला. त्यांच्या भाषणानंतर आदित्य म्हणाले की, शिवसेना भाजपामध्ये मध्यस्थी करायची असेल तर कल्याणच्या नरेंद्र पवारांनाच सांगायला हवे. आदित्य यांच्या या टिप्पणीवर हास्याची लकेर उठली.
अंबरनाथमध्ये शूटिंग रेंजचे उद््घाटन
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने तयार केलेल्या फिश मार्केट, बहुउद्देशीय इमारत आणि शूटिंग रेंजचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. अंबरनाथमध्ये दहा, २५ आणि ५० मीटर असे तीन रेंज उभारले आहेत. वरळी वगळता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असे रेंज नसल्याचे मत आदित्य यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आमदार बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.